कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक निकाली काढण्यात दिरंगाई भोवली; लिपिक निलंबित
जिल्हाधिकारी विकास मीना यांची धडक कारवाई;जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयाची घेतली झडती
यवतमाळ,
दि. 15 (जिमाका) : जिल्हा शल्य चिकित्सक
कार्यालयाला आज जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी कार्यालयातील
वैद्यकीय देयक कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली. त्यामध्ये जिल्ह्यातील शासकीय अधिकारी
व कर्मचाऱ्यांच्या मागील एका वर्षातील प्रलंबित वैद्यकीय देयकांची संख्या मोठ्या प्रमाणात
आढळून आली.
ही प्रलंबित
देयके निकाली काढण्यासंदर्भात यापूर्वीही जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सप्टेंबर महिन्यात
दोन आढावा बैठका घेतल्याने १७८ वैद्यकीय देयके
निकाली काढली होती. परंतू, त्यानंतरही मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित राहीली. त्यामुळे
जिल्हाधिकाऱ्यांनी याची प्रत्यक्ष पाहणी करुन झडती घेतली असता
अजूनही दोनशेहून
अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याचे उघडकीस आल्याने तसेच लोकसेवा हक्क कायद्यातील कालमर्यादेचे
उल्लंघन केल्याने देयकाचे काम हाताळणाऱ्या संबंधित लिपिकास तात्काळ प्रभावाने निलंबित
करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत.
Comments
Post a Comment