सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी आश्रमशाळा, वसतीगृहांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
> दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत विविध
स्पर्धा, प्रभात फेरी, पालक सभांचे आयोजित
यवतमाळ,
दि. 16 (जिमाका) : आदिवासी विकास विभाग, प्रकल्प
अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद या कार्यक्षेत्रातील कार्यरत असलेल्या
सर्व, शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह तसेच नामांकित शाळेमध्ये दि.
17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम
व उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमाची सुरुवात दि. 17 सप्टेंबरपासून सर्व
शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह तसेच नामांकित शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा,
वकृत्व स्पर्धा, गावातुन प्रभात फेरी, शाळा व्यवस्थापन समिती व पालक सभांचे आयोजन करण्यात
आलेले आहे. तसेच प्रकल्प कार्यालयातील विविध योजनांच्या माहितीचा चित्ररथ तयार करण्यात
आलेला आहे. सदर चित्ररथाव्दारे विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.
हा सेवा
संकल्प अभियान राज्यभर प्रभावीपणे पार पाडण्याकरीता आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.
अशोक उईके यांनी बैठका घेवून निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार प्रकल्पस्तरावर शासकीय
योजनांच्या लाभासाठी आदिवासी लाभार्थी मेळाव्याचे आयोजन, जनकल्याणाच्या माहिती देणारे
कला पथक व नाटयपथक, पारधी बेडयावर आरोग्य शिबीर, विविध दाखले देण्याकरीता शिबिर, तसेच
हुतात्मा नाग्या कातकरी जयंती निमीत्ताने आदिम जमाती लाभार्थ्यांना विविध दाखले वाटप
व मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.
यासोबतच,
लाभार्थ्यांच्या जीवनामध्ये झालेल्या सकारात्मक बदलाच्या यशोगाथा, आशीर्वादाचा दिवा
योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आशीर्वादाचा दिप प्रज्वलित करणे, राणी दुर्गावती
आदिवासी महिला बचत गट स्थापन करण्यासाठी मोहिम राबविणे, महिला सक्षमिकरण मेळावा, न्युक्लीअस
बजेट योजनेअंतर्गत थेट योजना लाभ वितरण विकास शाखेच्या विविध वैयक्तीक लाभ वितरण, आदिवासी
महिला व पुरुष लाभार्थी यांचा मेळावा आयोजन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.
तसेच आश्रमशाळा व वसतीगृहस्तरावर वृक्षारोपण कार्यक्रम,
व्यसनमुक्त समाज जागरुकता, योग शिबीर व ध्यानसत्र, विद्यार्थी आरोग्य तपासणी, स्वच्छता
अभियान, अॅनिमिया व सिकलसेल आजाराबाबतची माहिती, आदिवासी विद्यार्थ्यांना आधारकार्ड
वाटप, विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा जागरुकता, विद्यार्थ्यांना करीअर मार्गदर्शन,
स्पर्धापरीक्षा व पोलीस भरतीपुर्व मार्गदर्शन शिबीर, तसेच माझी आश्रमशाळा स्वच्छ सुंदर
शाळा हा नाविन्य उपक्रम स्पर्धात्मक गुणांकन करुन प्रोत्साहनपर बक्षिस देणे आदि योजना
कार्यक्रम/उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्प पुसद यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment