जिल्ह्यात २८ सप्टेंबरपासून कुष्ठरुग्ण शोध अभियान ; नागरिकांनी सहकार्य करावे




> जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन

> जिल्हा समन्वय समितीची सभा संपन्न


यवतमाळ, दि. २३ : जिल्ह्यातील कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यासाठी २८ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत यवतमाळ जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी कुष्ठरोगाचे निर्मूलनासाठी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आवाहन केले.

 कुष्ठरुग्ण शोध अभियानाबाबत जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी विकास मीना यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री यवतमाळ यांचे उपस्थितीत काल पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.


या अभियानात ग्रामीण भागातील सर्व (१०० टक्के) व शहरी भागातील निवडक जोखीमग्रस्त भागातील लोकाची घरोघरी जाऊन तपासणी आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयसेवक यांचे पथकाव्दारे करण्यात येणार आहे. शोधलेल्या सर्व संशयित कुष्ठरुग्णांची वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करुन निदान झालेल्या कुष्ठरुग्णांना त्वरीत औषधोपचार सुरु करण्यात येणार आहे.


सभेत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी कुष्ठरोगाचा प्रसार २०२७ पर्यंत शुण्यावर आणण्याचे उदिृष्ट पूर्ण करायचे आहे. यासाठी कुष्ठरोग शोध अभियान जिल्ह्यात दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार राबविण्यात यावे. तसेच या अभियानाचे पर्यवेक्षण गुणवत्तापूर्वक करण्यात यावे. अभियानाबाबत सर्व स्तरावर विविध माध्यमाद्वारे जनजागृती करावी, अशा सूचना उपस्थित सर्व अधिकारी यांना दिल्या. जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्याच्या दृष्टीने सर्व जनतेने वरील कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या पथकाकडुन कुटुंबातील सर्व सदस्याची तपासणी करुन घ्यावी. तसेच नागरिकांनी कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले.


या सभेकरीता डॉ. सुरेश असोले सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) यवतमाळ यांनी अभियान जिल्ह्यात राज्यस्तरावरुन दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार यशस्वीपणे राबविण्यासाठी केलेल्या नियोजनाबाबत विस्तृत माहिती सभेत दिली. या सभेकरीता डॉ. सुखदेव राठोड जिल्हा शल्य चिकीत्सक, डॉ. सुभाष ढोले जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रदिप गोडे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्रा. सुहास वाघमारे म. ज्योतीबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क, प्राचार्य सचिन महल्ले, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या डॉ. प्रिती दुधे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक बोपचे, जिल्हा आशा समन्वयक खंदारे उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित