रब्बी हंगामात अनुदानावर मिळणार हरभरा, मसूर बियाणे महाडीबीटीवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. २१ (जिमाका) : केंद्र शासनाच्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान २०२६-२७ अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासह कडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी रब्बी हंगामात हरभरा व मसूर पिकाचे प्रात्यक्षिक आणि प्रमाणित बियाणे वितरणाचे घटक राबविण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे खरेदीवर शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार असून, त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाण्यांसाठी पाच वर्षांच्या आतील नवीन वाणाकरिता बियाणे किमतीच्या ७५ टक्के किंवा कमाल ६ हजार रुपये प्रति क्विंटल, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच पाच ते दहा वर्षांमधील वाणासाठी बियाणे किमतीच्या ५० टक्के किंवा कमाल ४ हजार रुपये प्रति क्विंटल, यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून मिळणार आहे. मसूर पिकासाठी पाच वर्षांच्या आतील नवीन वाणाच्या प्रमाणित बियाणे वितरण किमतीवर १०० टक्के अनुदान, तर पाच ते दहा वर्षांमधील वाणासाठी बियाणे किमतीच्या ५० टक्के किंवा कमाल ४ हजार रुपये प्रति क्विंटल, यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून दिली जाणार आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार व उत्पादन वाढीसाठी प्रात्यक्षिकांचे लक्षांक मंजूर करण्यात आले आहेत हरभरा पीक प्रात्यक्षिक १० हेक्टर प्रति प्रात्यक्षिक याप्रमाणे जिल्ह्यात एकूण ३३ प्रात्यक्षिकांचे लक्षांक निर्धारित करण्यात आले आहेत. मसूर पीक प्रात्यक्षिक १० हेक्टर प्रति प्रात्यक्षिक याप्रमाणे जिल्ह्यात एकूण १० प्रात्यक्षिकांचे लक्षांक निर्धारित करण्यात आले आहेत.
यवतमाळ जिल्हातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या अभियानाचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेतात सुधारित अधिसूचित वार्णाच्या बियाण्यांचा वापर करून कडधान्य उत्पादन वाढवावे. महाडीबीटी पोर्टलवर "बियाणे वितरण", "सीडकीट/मिनिकीट" व "प्रात्यक्षिक" या टाईल अंतर्गत अर्ज करता येतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ मनोजकुमार ढगे यांचे मार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या क्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा मंडळ कृषी अधिकारी / सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
लाभार्थी योजनेअंतर्गत पिक प्रात्यक्षिक याबाबी करिता नोंदणीकृत शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / शेतकरी उत्पादक सहकारी संस्था यांनीय महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे. तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबी करिता वैयक्तीक शेतकरी यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे. संकेतस्थळ :https://mahadbt.maharashtra.
000
Comments
Post a Comment