कृषी विद्यापीठाद्वारे शिवार फेरीचे आयोजन
शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
यवतमाळ,
दि. 17 (जिमाका) : डॉ. पंजाबराव देशमुख
कृषी विद्यापीठ, अकोला मुख्यालयी येथे विद्यापीठ स्थापन दिनाचे औचित्य साधून यावर्षी
विद्यापीठ शिवार फेरी दि. २० ते २२ सप्टेंबर, २०२६ या तीन दिवसीय कालावधीत आयोजित करण्यात
येणार आहे. या शिवार फेरीचे उद्घाटन दि. २० सप्टेंबर, रोजी सकाळी ११ वाजता प्रस्तावित
आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे दि. २० ते २२ सप्टेंबर, २०२६ या कालावधीत
शिवार फेरी आणि थेट पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची
माहिती व्हावी या उद्देशाने करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शिवार फेरी रविवार
दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी अकोला,
वाशीम, बुलढाणा व गोंदिया येथे, सोमवार २१ सप्टेंबर रोजी वर्धा, नागपूर व गडचिरोली
येथे तर मंगळवार दि. २२ सप्टेंबर, २०२६ रोजी अमरावती, यवतमाळ, भंडारा व चंद्रपूर येथे
आयोजित केला आहे.
या शिवार
फेरी तसेच थेट पिक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकरी, संशोधन,
धोरणकर्ते आणि उद्योग भागधारकांना ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी, अत्याधुनिक कृषी
पद्धतींबद्दल जाणून घेण्यासाठी आणि शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतींची खात्री
करून पिक उत्पादकता वाढवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे असे असून या तीन दिवशीय
शिवार फेरी मध्ये पुढिल वैशिष्ट्य पूर्ण बाबींचा समावेश असणार आहे.
३०० प्रगत
खरीप पिक उत्पादन तंत्रांचे २५ एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी थेट प्रात्यक्षिके उदा.
तृणधान्य, कडधान्य, कापूस, सोयाबीन, भाजीपाला, फळपिके, फुलपिके, चार पिके, धान पिके
आणि त्यांचे तंत्रज्ञान इत्यादी. १४ खाजगी
कृषी निविष्ठा कंपन्यांची थेट प्रात्यक्षिके. विद्यापिठाच्या विविध संशोधन विभागांचे
३२०० हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून पाहण्याची संधी उपलब्ध
होणार आहे. यामध्ये मध्यवर्ती संशोधन केंद्र येथे सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रावर बिबिएफ
तंत्रज्ञान वापर करून सोयाबीन बिजोत्पादन. या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रातील २ लाख
शेतकरी बांधवांचा सहभाग अपेक्षित राहील. आपल्या प्रदेशातील कृषी क्षेत्रा समोरील आव्हाने
आणि संधी यावर चर्चा सत्र होणार आहे.
शेतकरी बंधू
भगिनींनी या शिवार फेरीमध्ये सहभागी होवून वरील बाबींचा लाभ घ्यावा अशी विनंती डॉ.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी
केले आहे. तसेच दि. २२ सप्टेंबर, २०२६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी
बांधवांनी या शिवार फेरीमध्ये सहभागी होवून या शिवार फेरीचा लाभ घ्यावा अशी विनंती
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. दीपक बा. कच्छवे यांनी केली
आहे.
Comments
Post a Comment