आदिवासी विद्यार्थी व बेरोजगार युवकांचे बेमुदत आंदोलन स्थगित आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या मध्यस्थीला यश

 



 आंदोलकांच्या विविध मागण्या मान्य ; अडीअडचणींबाबत मुख्य सचिवांकडे १५ सप्टेंबरला बैठक

यवतमाळ दि. 7 (जिमाका): आदिवासींची विशेष पदभरती आणि विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर सुरु असलेल्या आदिवासी विद्यार्थी व बेरोजगार युवकांचे बेमुदत आंदोलन आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण, ग्रामविकास, आरोग्य यासह विविध विभागातील व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, वन इ. विभागातील पेसा नॅान पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती  प्रवर्गाच्या पदभरतीसंदर्भात आदिवासी विद्यार्थी व बेरोजगार युवकांचे आंदोलन सुरु होते. या आंदोलनाची शासनाने दखल घेत त्यांच्या पदभरतीच्या मागण्यासंदर्भात आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीत अनुसूचित जमाती प्रवर्गाची पदभरती सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर आज (दि.७) रोजी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी विकास मीना, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी आणि आंदोलक विद्यार्थी यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे बैठक झाली.

 

या बैठकीत आंदोलकांच्या विविध मागण्या मान्य करण्यात आल्या. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अनुसूचित जमाती प्रवर्गाची पदभरती, रिक्त पदे, समायोजित पदे, बिंदुनामावली, सेवा प्रवेश नियम व अडचणींबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यामधील शासनस्तरावरील अडचणी सोडविण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे विविध विभागांच्या सचिवांची बैठक घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच सर्व माहिती आंदोलनकर्त्यांना उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी विभाग प्रमुखांना दिले.

या बैठकीत सकारात्मक चर्चेनंतर आंदोलनकर्त्या विद्यार्थी व युवकांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच  मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आंदोलनस्थळी जावून विद्यार्थी व बेरोजगार युवकांसोबत संवाद साधून आंदोलन सोडवले.

या बैठकीला सहायक जिल्हाधिकारी रेवैयाह डोंगरे, उप वनसंरक्षक नवनीत मिश्रा, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, निवासी उपजिल्हधिकारी अनिरुद्ध बक्षी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित