वन हुतात्म्यांना वनअधिकारी, कर्मचाऱ्यांची मानवंदना
यवतमाळ, दि. 11 : वनहुतात्मा दिनानिमित्त यवतमाळ वनवृत्तातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज वनभवनाच्या प्रांगणात शहीद स्मारकाजवळ वन हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली.
2013 पासून 11 सप्टेंबर हा दिवस वनहुतात्मा दिवस म्हणून भारतभर पाळल्या जाते. या दिवशी वने, वन्यजीव, वनसंपदा यांचे रक्षण करताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वन अधिकारी व कर्मचारी यांना भारतभर कार्यक्रमाचे आयोजन करून वन शहिदाच्या आठवणींना उजाळा दिला जातो. राजस्थान येथील खेजरली या गावात खेजरी वृक्षाच्या रक्षणार्थ बलिदान देण्याऱ्या अमृता देवी व इतर 350 बिश्नोई समाजाच्या लोकांनी अठराव्या शतकात बलिदान दिले होते. त्यांच्या स्मरणात हुतात्मा दिनाचे पालन केले जाते.
या कार्यक्रमाला मुख्यवन संरक्षक यवतमाळ, उपवनसंरक्षक यवतमाळ, उपसंरक्षक व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्य वन संरक्षक डॉ. किशोर. एस. मानकर यांनी वन हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. तसेच प्रादेशिक उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग, उपवनसंरक्षक अमलेंदू पाठक, विभागीय वन अधिकारी अनिल निमजे, विभागीय वन अधिकारी परवीन पठाण, सामाजिक वनीकरणच्या विभागीय वन अधिकारी प्रणिता पारधी यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली दिली.
याप्रसंगी डॉ. किशोर. एस. मानकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना वन्य व वन्यजीवांचे संरक्षण करताना वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाकूड तस्कर, वन्यजीव शिकारी, खानमाफीया यांच्यापासून वन्यजीवाचे संरक्षण करताना कशाप्रकारे भारतीय वन सेवेतील तसेच राज्य वन सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली हे विशद केले. चंदन तस्कर विरप्पन ह्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले श्री. पी. श्रीनीवास यांच्या कार्याला उजाळा दिला. काही अधिकारी व कर्मचारी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात सुद्धा मृत्युमुखी पडतात व जंगलात असताना वन- वनव्यात व इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांचा जीव धोक्यात घालवावा लागतो. त्यामुळे वनसंपदेचा संरक्षण करताना जीवित हानी होणार नाही याकरिता लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
00000

Comments
Post a Comment