शासकीय वसतीगृह प्रवेश व पंडित दीनदयाळ स्वयंम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन


यवतमाळ, दि. 11 (जिमाका) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा अंतर्गत अनुसूचित जमातीच्या (एसटी) विद्यार्थ्यांसाठी मुलींची 9 व मुलांची 10 अशी एकूण 19 शासकीय वसतीगृहे कार्यरत आहेत. शैक्षणिक सत्र 2026-27 करिता माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित अनुसूचित जमातीच्या नवीन (न्यू) व जुन्या (रिन्यू) विद्यार्थ्यांच्या वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

वसतीगृह प्रवेशासाठी तसेच वसतीगृहाची क्षमता पूर्ण असल्यास प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामुळे स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी वसतीगृह प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज करणे सर्व नवीन विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक राहील.

नवीन विद्यार्थ्यांनी https://swayam.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज करतांना आपला युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून ऑनलाईन अर्ज भरतांना न्यू हा पर्याय निवडून भरावा. जुन्या विद्यार्थ्यांनी  रिन्यू पर्याय निवडून विहित मुदतीत आपला अर्ज अपडेट किंवा सादर करावा.

अर्जासोबत ऑनलाईन  शेवटच्या वर्षाची, सत्राची गुणपत्रिका, इयत्ता 10 वी ची गुणपत्रिका, इयत्ता 11 वी ची गुणपत्रिका, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, सन 2024-25 चा पालकांचा उत्पन्नाचा दाखला, महाविद्यालयात/विद्यालयात प्रवेश घेतल्याची फी पावती, बोनाफाईड प्रमाणपत्र, आधार कार्ड, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, बँक पासबुकची छायांकित प्रत, पासपोर्ट साईज फोटो,  अपंगत्व, अनाथ असल्यास संबंधित सक्षम प्राधिकरणाचा दाखला अर्जात नोंद असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून मूळ कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जाची प्रिंट संबंधित वसतीगृहाच्या गृहपालांकडे मुदतीत जमा करावी. संकेतस्थळ सुरू आणि बंद होण्याच्या तारखांबाबतची सविस्तर माहिती पोर्टलवरील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी वाय. एस. आठवले यांच्या वतीने करण्यात आले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित