पोकरा प्रकल्पांतर्गत विविध घटकांसाठी अनुदान


>अर्ज करण्याचे आवाहन

>कृषी संलग्न व्यवसायांसाठी ६० टक्के अनुदान मिळणार

यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येत असलेल्या ‘नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-२’अर्थात पोकरा प्रकल्पांतर्गत  जिल्ह्यातील निवडक ५५९ गावांमध्ये अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. हवामान बदलामुळे शेती क्षेत्रासमोर निर्माण होणाऱ्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पांतर्गत विविध घटकांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.

प्रकल्पांतर्गत निवडक गावांमधील पात्र शेतकऱ्यांना वैयक्तिक घटकांमध्ये सिंचन सुविधा, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, फळबाग, बांबू व वृक्ष लागवड, रेशीम उद्योग, शेडनेट व पॉलीहाउस साहित्य, बीज उत्पादन, विहीर पुनर्भरण, गांडूळ खत व नाडेप कंपोस्ट युनिट, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, पंपसंच व पाईपद्वारे पाणी उपसा, शेळीपालन आदी घटकांसाठी विहित मार्गदर्शक सूचनांनुसार लाभ देण्यात येणार आहे.

या घटकांसाठी पाच हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेले अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी पात्र राहणार आहेत. मात्र, बीज उत्पादन या घटकासाठी जमीनधारणेची कोणतीही अट लागू राहणार नाही. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी संबंधित घटकांची माहिती घेऊन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा, यासोबतच प्रकल्प जिल्ह्यातील गावांमध्ये पायाभूत साठवणूक सुविधा, प्रक्रिया युनिट तसेच कृषी संलग्न इतर व्यवसायांसाठीही अर्ज मागविण्यात आले आहेत. या घटकांसाठी शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी), आत्मा अंतर्गत शेतकरी गट, उमेद (एमएसआरएलएम) व माविम पुरस्कृत महिला बचत गट, महिला ग्राम संघ, महिला प्रभाग संघ तसेच सीएमआरसी हे पात्र राहणार आहेत.

या गटांसाठी प्रकल्प मूल्याच्या ६० टक्के अनुदान देय राहणार आहे. इच्छुक पात्र गटांनी एफपीओ-डीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासाठी संकेतस्थळ https://dbtndksp.mahapocra.gov.in/  तसेच ‘महाविस्तार एआय’मोबाईल ॲपद्वारेदेखील अर्ज करता येणार आहे.

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील किंवा नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पात्र अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी तसेच पात्र शेतकरी गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित