जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियानांतर्गत सर्वेक्षणाला सुरुवात
> ६ लाख घरांना भेटी देणार ; २,७३७ पथक तयार
यवतमाळ, दि.28
(जिमाका) : कुष्ठरोगाचे लवकर
निदान, त्वरीत उपचार आणी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात आजपासून कुष्ठरोग शोध
अभियानाला सुरुवात झाली आहे. दि. २८ सप्टेंबर
ते १४ ऑक्टोबर या कालावधीत हा अभियान जिल्हाधिकारी
विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल
खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक
संचालक कुष्ठरोग कार्यक्रमाचे डॉ. सुरेश असोले यांच्या नियोजनानुसार राबविण्यात येत
आहे.
या अभियानामध्ये आशा स्वयंसेविका व प्रशिक्षित
पुरुष स्वयंसेवक यांचे पथकाद्वारे कुष्ठरोगाबाबत घरोघर सर्वेक्षणाद्वारे लोकांची शारीरिक
तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण ६ लाख १ हजार १३७ घरांना भेटी देऊन २६ लाख
२८ हजार ३५७ लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता आशा सेविका व प्रशिक्षित पुरुष
स्वयंसेवकांचे पथकाव्दारे जिल्ह्यातील ग्रामीण
भाग १०० टक्के व शहरी जोखिमग्रस्त भागातील सर्व घरांचे सर्वक्षण करण्यात येणार आहे. कुष्ठरोग आजाराबाबत माहिती देऊन घरातील सर्व सदस्यांची
कुष्ठरोगाबाबत आशा सेविका व पुरुषांची पुरुष स्वयंसेवकांद्वारे महिलांची शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाकरिता जिल्ह्यात
२७३७ पथक तयार करण्यात आले असून पर्यवेक्षण करण्याकरीता ५७० आरोग्य कर्मचारी यांची
पर्यवेक्षणाकरीता निवड करण्यात आली आहे.
या अभियानाबाबत लोकांमध्ये, शाळांमध्ये,
आठवडी बाजार, सार्वजनिक ठिकाणी पोस्टर, बॅनर, मायकिंगद्वारे जनजागृती, गावातील मंदीर,
मस्जिद या धार्मिक स्थळामधून कुष्ठरोग शोध मोहिमेबाबत लोकांना माहिती देणे, प्रसारमाध्यम,
सर्व सरपंच यांना मोहीमेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन पत्र देण्यात येत
आहे.
शासनाने ठरवून दिलेले उदिष्टाप्रमाणे वर्ष
२०२७ पर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार जुन्यावर आणणे, विकृती कुष्ठरुग्ण व लहान मुलांचे प्रमाण
शून्य करणे, कुष्ठरोगाबाबत असलेला गैरसमज व भेदभाव दुर करणे याकरीता कुष्ठरोगमुक्त
अभियान राबविण्यात येत आहे. कुष्ठरोग आजार हा मायकोबॅक्टेरीयम लेप्री या जंतु पासून
होतो. कुष्ठरोग हा एमडीटी औषधोपचाराने पूर्णपणे बरा होतो कुष्ठरोगाचे निदान व औषधोपचार
सर्व सरकारी दवाखान्यात मोफत उपलब्ध आहे. कुष्ठरोग हा उपचाराने पूर्णपणे बरा होणारा
आजार असून वेळेवर निदान झाल्यास विकृती टाळता येते त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही भीती
किंवा संकोचाविना आरोग्य पथकाकडून आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करुन घ्यावी.
आपले गाव, जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी नागरीकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा,
असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून केले आहे.

Comments
Post a Comment