शौर्यदिन समारंभ व माजी सैनिक मेळावा उत्साहात

 


वीरमाता, वीरपत्नी व वीरनारींचा जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते सत्कार        यवतमाळ, दि.29 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे आज शौर्यदिन समारंभ व माजी सैनिक मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते वीरमाता, वीरपत्नी व वीरनारींचा सत्कार करण्यात आला.

            आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले वणी येथील शहीद जवान विकास कुळमेथे यांच्या पत्नी स्नेहा विकास कुळमेथे यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ‘ऑपरेशन सर्जिकल स्ट्राईक वीरगाथा’ या कार्यक्रमातून भारतीय जवानांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले.

            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विकास मीना होते. निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी आणि सेवानिवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिनेश तत्ववादी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

            यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी विकास मीना म्हणाले की, शौर्यदिन समारंभ व माजी सैनिक मेळाव्याच्या माध्यमातून माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी आणि प्रशासन यांच्यात संवादाची संधी निर्माण झाली असून, एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मातृभूमीचे रक्षण करणे आणि देशाच्या रक्षणासाठी आपल्या पाल्यांना सीमेवर पाठविणे हे देखील शौर्यच आहे. देशाच्या संरक्षणात सैनिकांचे मोठे योगदान असून त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी आहोत. शहीदांच्या कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह माजी सैनिक, वीरमाता व वीरपत्नींचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

            निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी प्रास्ताविकातून शौर्यदिन तसेच सर्जिकल स्ट्राईकची माहिती दिली. सर्जिकल स्ट्राईक मोहिमेत वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील सुपुत्रांचा मोठा वाटा होता. त्यांच्या शौर्याला सलाम करण्याचा हा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. माजी सैनिकांच्या जमिनीसंबंधीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येत असून, त्यांचे प्रश्न संवेदनशीलतेने सोडविले जात आहेत. माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी आणि त्यांच्या पाल्यांच्या कल्याणासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

            यावेळी शाळकरी मुलींनी राष्ट्रभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या विद्यार्थिनींचा जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमाला माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी तसेच त्यांचे पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भगवान रेडेकर यांनी केले, तर सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अरविंद धनवीज यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित