महागाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केली पाहणी...!

 


       यवतमाळ, दि.24 (जिमाका) : महागाव तालुक्यातील काळी दौलतखान सर्कलमध्ये कोनदरी, कासोळा, काळी दौ. येथे कोरड्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली.

नदी-नाले, तलाव व जलसाठे कोरडे पडत चाललल्याने परिसरात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोयाबीन, कापूस व तूर या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी शेतकऱ्यांशी आदरपूर्वक संवाद साधत त्यांच्या समस्या, पीक परिस्थिती आणि झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रत्येक अडचणीची गांभीर्याने दखल घेत, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.

शेतकऱ्यांना दिलासा देताना राज्यमंत्री नाईक यांनी दुष्काळी परिस्थितीत आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, तसेच पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

यावेळी महागाव मधील परिवीक्षाधीन उपविभागीय अधिकारी एकले, गटविकास अधिकारी तुळशीराम चव्हाण, विस्तार अधिकारी एस. डी. जाधव, ग्रामपंचायत अधिकारी विपुल भवरे, महावितरणचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, तलाठी, कृषी सहाय्यक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित