सेवा संकल्प अभियानांतर्गत सर्प शिक्षा अभियान व आरोग्य शिबिर संपन्न
यवतमाळ, दि.24
(जिमाका) : प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, वसंतपूर, ता.
दिग्रस तसेच शासकीय आदिवासी कन्या आश्रमशाळा, हर्षी, ता. पुसद येथे सर्प शिक्षा अभियान
व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद अंतर्गत येणाऱ्या
२० शासकीय आश्रमशाळांमधील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आलेले विद्यार्थी व शिक्षक
उपस्थित होते.
सर्प शिक्षा अभियानांतर्गत सर्प मित्र विनय कुलकर्णी, निसर्ग मल्टीपर्पज
फाउंडेशन, मेहकर यांनी विद्यार्थ्यांना सापांची ओळख, सापांबाबतचे समज-गैरसमज तसेच सर्पदंश
झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
त्यांनी विषारी सापांमधील नाग, घोणस, फुरसे व मण्यार या प्रमुख चार
प्रकारांची माहिती देतानाच विविध बिनविषारी सापांचीही माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी दिनेश पिंपरे यांनी ‘सर्पदंश व अंधश्रद्धा’ या विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन
केले. या अभियानातून मिळालेले सर्पविषयक ज्ञान आपल्या गावातील इतर नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा
संकल्प विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, डॉ. संजय जाधव व त्यांच्या वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली
शालेय विद्यार्थी तसेच केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंची आरोग्य तपासणी
करण्यात आली. आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना योग्य औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन
देण्यात आले.
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात
आलेल्या या उपक्रमादरम्यान प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांच्या उपस्थितीत सर्प शिक्षा
अभियान व आरोग्य शिबीर यशस्वीरीत्या पार पडले.

Comments
Post a Comment