पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके शेतकऱ्यांच्या बांधावर

 


दुष्काळसदृश्य भागातील पिकांची पाहणी; शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

             यवतमाळ, दि.24 (जिमाका) : एलनिनोच्या प्रभावामुळे पावसात पडलेला खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आज बाभूळगाव, नेर आणि यवतमाळ तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

            बाभूळगाव तालुक्यातील सारफळी येथे शकुंतला दुधे या महिला शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. तसेच संजय राठी यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी करून पिकांची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. घारफळ येथील यशवंत कोल्हेकर यांच्या शेतातील सोयाबीन व कापूस पिकांचीही पाहणी करण्यात आली.

            यानंतर नेर तालुक्यातील धनज तसेच यवतमाळ तालुक्यातील लासिना परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यात आली. यावेळी मंत्र्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत पिकांची स्थिती, पावसातील खंड, झालेल्या नुकसानीचे प्रमाण आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन

            दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासन संवेदनशील असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही करण्यात येईल, असे पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष बांधावर जाऊन जाणून घेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

            यावेळी आमदार किसन वानखेडे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार राजू तोडसाम, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, तलाठी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित