महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यवतमाळ येथे जनसंवाद कार्यक्रम संपन्न

 

 

यवतमाळ दि. २४ : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज), अकोला अंतर्गत जिल्हा कार्यालय, यवतमाळ यांच्या वतीने महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गणेशोत्सवाच्या औचित्याने दि.२४ सप्टेंबर २०२६ रोजी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अकोला महाबीज, व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाला.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील महाबीजचे सन्माननीय भागधारक, बिजोत्पादक शेतकरी, महाबीज विक्रेते तसेच अधीकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमस्थळी छोटेखाणी प्रदर्शपनी भरवीण्यात येवून प्रदर्शनामध्ये महाबीजची प्रमाणित बियाणे ज्वारी, करडई, मोहरी, हरभरा तसेच विविध पिकांच्या वाणांची माहिती देण्यात आली. यासोबतच रायझोबियम, अझोटोबॅक्टर, पी.एस.बी., के.एम.बी., महाजैविक, ट्रायकोडर्मा यांसारखी जैविक उत्पादने, कर्बमापक किट, निमास्त्र अतिसूक्ष्म निंबोळी पावडर, महास्पीड रॅपिड डिकंपोझर तसेच ताग व ढेंचा या हिरवळीच्या खतांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.

तसेच महाबीजच्या विविध बियाणे व जैविक उत्पादने, रब्बी हंगाम २०२६ मधील बिजोत्पादन व विपणन अंतर्गत येणार गहु हरभरा इत्यादी वाणाचा प्रचार, प्रसार व जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा व्यवस्थापक एस.आर. मोहकर यांनी उपस्थित शेतकरी व बिजोत्पादकांना विविध पिकांच्या वाणांची वैशिष्ट्ये व उपयोग याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महाबीजच्या पिक वाणांचा अधिकाधिक वापर करून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी लहूदास आडे यांनी अध्यक्षीय भाषणातून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. तसेच उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करून महाबीजच्या विविध पिक वाणांचा व जैवीक उत्पादनाचा वापर करण्याबाबतही मार्गदर्शन केले.

तसेच प्रमुख पाहुणे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दीपक कच्छवे, यांनी सद्यस्थितीतील हवामानातील बदल, त्याचा शेतीवर होणारा परिणाम तसेच पिकांचे संरक्षण व उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले व जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी सविता भिंगारदे, यांनी बियाण्यांची पेरणी, पिक वाणांची निवड, जमिनीची आवश्यकता, वाणांमधील अंतर तसेच बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या निकषांबाबत उपस्थित बिजोत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बिजोत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी श्री. ओले पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या व अडचणी प्रशासनासमोर मांडून शेतकरी वर्गास आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले.

हा कार्यक्रम जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी क्षेत्र अधिकारी मेघाताई कुमरे यांनी केले, तर कृषी क्षेत्र अधिकारी नितेश पुसाम यांनी समारोपीय भाषण केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा कार्यालयातील लेखा सहायक प्रज्ञा बावनथडे,  लिपीक टंकलेखक संदीप बनारसे, लिपीक संजीव तुनकीवार, निलेश वडस्कर, श्री. वाडवे तसेच बीज प्रक्रिया केंद्राचे केंद्र व्यवस्थापक विठ्ठल ए. रेवस्कर, सहकारी रविंद्र धुर्वे, श्री. दुर्वे, कु. डाखोरे व पारधी तसेच बिजोत्पादक शेतकरी अरविंद थोकळ, उमेश लांडे, रविद्र धीरण, आकाश मुंदडा इत्यादीचे मोलाचे सहकार्य लाभले.

000

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित