आता खतासाठी रांगेत उभे राण्याची गरज नाही !

 

आता खतासाठी रांगेत उभे राण्याची गरज नाही !

मोबाईल ॲपवरुन खताची बुकिंग करता येणार

>२५ सप्टेंबरपासून ‘एफएफएस’ प्रणाली लागू

>आता क्यूआर कोडद्वारे अधिकृत केंद्रातून खताची उचल करा

             यवतमाळ, दि.28 (जिमाका) : शेतकऱ्यांना अनुदानित खतांची खरेदी अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी व्हावी, यासाठी जिल्ह्यात २५ सप्टेंबर पासून फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल (एफएफएस) या पथदर्शी डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रणालीमुळे आता शेतकऱ्यांना खतासाठी कृषी सेवा केंद्रावर रांगेत उभे राहण्याची गरज नसून घरबसल्या मोबाईलवरूनच खताची मागणी किंवा बुकिंग करता येणार आहे.

            एफएफएस प्रणालीद्वारे शेतकरी मोबाईल ॲपद्वारे आपल्या फार्मर आयडी, जमीन आणि पीक माहितीच्या आधारे आवश्यक खताची बुकींग करू शकणार आहेत. बुकिंगच्या वेळी उपलब्ध खतसाठा असलेल्या अधिकृत विक्रेत्यांची माहिती पाहून आपल्या सोयीचा विक्रेता निवडता येणार आहे. बुकिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला क्यूआर कोड किंवा टोकन प्राप्त होईल. त्यानंतर संबंधित कृषी सेवा केंद्रावर क्यूआर कोड दाखवून पॉस व्यवहार पूर्ण केल्यानंतर खत आणि पावती घेता येणार आहे.

एफएफएस प्रणालीचे फायदे

            या डिजिटल प्रणालीमुळे घरबसल्या खताची नोंदणी करता येणार असून, उपलब्ध साठ्याची माहिती पाहून विक्रेता निवडण्याची सुविधा मिळणार आहे. कृषी सेवा केंद्रावरील गर्दी आणि प्रतीक्षा वेळ कमी होण्यास मदत होणार असून, खत खरेदीची डिजिटल नोंद राहणार आहे. तसेच अनुदानित खताच्या वितरणात पारदर्शकता वाढण्यास आणि खताची मागणी व उपलब्धतेचे नियोजन करण्यास मदत होणार आहे. यासोबतच पिकानुसार शिफारस केलेल्या खताचे प्रमाण देखील समजण्यास मदत होणार आहे.

ॲपवर अशी करा खताची बुकिंग

            एफएफएस अॅप डाउनलोड करुन उघडल्यानंतर फार्मर आयडी अथवा आधार क्रमांकाद्वारे ओटीपी पडताळणी करावी. त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव आणि गट क्रमांकाच्या आधारे संबंधित जमीन निवडावी. हंगाम व लागवड केलेले पीक निवडावे. त्यानंतर पिकानुसार शिफारस केलेले खत आणि आवश्यक प्रमाण तपासावे. उपलब्ध साठा आणि अंतर पाहून अधिकृत खत विक्रेता निवडावा. आवश्यक खताचे प्रमाण निश्चित करून अर्ज सादर करावा आणि बुकिंग पूर्ण करावे.

            बुकिंग यशस्वी झाल्यानंतर मिळालेला क्यूआर कोड किंवा टोकन सुरक्षित ठेवावे. निवडलेल्या कृषी सेवा केंद्रावर क्यूआर कोड दाखवून पॉस व्यवहार पूर्ण केल्यानंतर खत व पावती प्राप्त करून घ्यावी.

फार्मर आयडी असणे आवश्यक

            एफएफएस प्रणालीच्या सुरळीत वापरासाठी अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी तयार केलेला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर तयार करून घ्यावा. शेतकऱ्यांनी जमीन नोंद, पीक माहिती आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खताची खरेदी केवळ अधिकृत व नोंदणीकृत विक्रेत्याकडूनच करावी. प्राप्त झालेला क्यूआर कोड किंवा टोकन सुरक्षित ठेवावा. खताची उचल करताना पॉस पावतीवरील खताचा प्रकार, प्रमाण आणि रक्कम तपासून घ्यावी.

गावागावांत जनजागृती

            एफएफएस प्रणालीची माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत गावपातळीवर शेतकरी सभा, ग्रामसभा, कृषी सेवा केंद्रे तसेच कृषी सहाय्यक, कृषी मित्र, कृषी सखी, एटीएम आणि बीटीएम यांच्या माध्यमातून प्रशिक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे.

            जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ खत विक्रेत्यांनी आयएफएमएस व पॉसवरील साठा अद्ययावत ठेवावा. प्रत्यक्ष साठा आणि प्रणालीवरील साठ्यामध्ये तफावत राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. एफएफएस प्रणालीद्वारे प्राप्त क्यूआर कोड किंवा टोकननुसारच व्यवहार पूर्ण करावा, तसेच शेतकऱ्यांना अॅप वापराबाबत आवश्यक मार्गदर्शन करावे, असे निर्देश कृषी विभागाकडून देण्यात आले आहे.

अडचणीसाठी कृषी विभागाशी संपर्क करा

            एफएफएस अॅप, फार्मर आयडी, जमीन माहिती, खत बुकिंग किंवा खत वितरणासंदर्भात अडचण असल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), पंचायत समितीचे कृषी अधिकारी तसेच गावातील कृषी सहाय्यक, समूह सहाय्यक, कृषी मित्र आणि कृषी सखी यांच्याशी संपर्क साधावा.मोबाईलवर बुकिंग करा, क्यूआर कोड मिळवा आणि अधिकृत कृषी सेवा केंद्रातून खताची उचल करा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित