पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा

 


दुष्काळसदृश्य परिस्थितीत अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करावे

पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश

             यवतमाळ, दि.24 (जिमाका) : जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश्य परिस्थिती तसेच पिकांच्या स्थितीबाबत पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गुरुवार, (दि.२४) रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी दुष्काळसदृश्य परिस्थितीत कृषी, महसूल, ग्रामविकास, सिंचन, पशुसंवर्धन आदी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

            या बैठकीत पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन पीक पेरणी, पावसाची स्थिती, पिकांची सद्यस्थिती, पावसाच्या खंडामुळे पिकांवरील परिणाम, शेतपिकाचे नुकसान, पीक कापणी, पीक विमा, सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा, जलतारा, बंधाऱ्यांची स्थिती, पशुधन, चारा उपलब्धता, नळ पाणीपुरवठा योजना, पाणी टंचाई आराखडा, कमी पाणी लागणाऱ्या पिकांबाबत प्रचार-प्रसार, शेतकऱ्यांसमोरील अडचणी याबाबत सविस्तर आढावा घेवून उपाययोजनांवर चर्चा केली.

            बैठकीस आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, खासदार संजय देशमुख, आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार किसन वानखेडे, आमदार राजू तोडसाम, आमदार संजय देरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, विविध विभागाचे प्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

            जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेताना पालकमंत्री संजय राठोड यांनी दुष्काळसदृश्य परिस्थितीत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करावे. पीक कापणी वेळेत करावी. जलसंधारणाची कामे पूर्ण करावीत. एलनिनो संकटाच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामात कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित व मार्गदर्शन करावे. त्यासाठी बीबियाणे तयार ठेवावे. तसेच याबाबतचा आराखडा तयार करून निधी मागणीचा प्रस्ताव सादर करावा. ज्या योजना ९० टक्के पूर्ण झाल्या परंतु निधी अभावी अपूर्ण आहेत अशा योजनांचा आराखडा सादर करावा. जनसुविधेतील कामांऐवजी दुष्काळसदृश्य परिस्थिती निवारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झाला असून त्यानुसार काम करावे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

            यावर्षी जिल्ह्यात ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, कापूस पिकाची स्थिती नाजूक असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.

            या बैठकीतील सूचना आणि पीक परिस्थितीबाबत  पुन्हा आढावा बैठक घेण्यात येईल, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

या बैठकीत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आमदार  राजू तोडसाम, आमदार किसन वानखेडे, आमदार संजय देरकर यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यानुसार गांभीर्याने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित