सदोष बियाण्यांबाबत तक्रारी तात्काळ नोंदवा;

 


जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे शेतकऱ्यांना आवाहन

            यवतमाळ, दि.7 (जिमाका) : चालू हंगामात पिकांची पेरणी किंवा लागवड केल्यानंतर बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याची अथवा बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या तालुका तक्रार निवारण समितीकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ यांनी केले आहे.

            तक्रार दाखल करताना शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करतांना दुकानदाराकडून घेतलेले मूळ व पक्के बिल जोडावे. खरेदीच्या बिलावर शेतकऱ्याचे नाव, बियाण्याचा वाण, लॉट क्रमांक आणि किंमत स्पष्ट नमूद असावी. ज्या शेतात  वियांण्यांची पेरणी किंवा लागवड करण्यात आली त्या शेतीचा अद्ययावत ७/१२ उतारा जोडणे अनिवार्य आहे.  तसेच शेतात कोणत्या पिकाची आणि कोण्त्या वाणाची लागवड केली आहे व  पेरणी किंवा लागवडीची अचूक तारीख आदी माहिती अर्जात नमूद असणे आवश्यक आहे.

            कृषी विभागाने शेतकऱ्यांना बियाणे खरेदीनंतर त्याचे रिकामे पाकीट, बॅग आणि त्यावरील टॅग फेकून न देता तक्रार निकाली  निघेपर्यंत सुरक्षित जतन करून ठेवावा. प्रत्यक्ष शेत पाहणीदरम्यान समितीला दाखवावा.

            जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्याची बियाण्यांबाबत फसवणूक झाल्यास त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील तक्रार निवारण समितीकडे विहित नमुन्यात तक्रार नोदवावी. तक्रार प्राप्त होताच कृषी विभागाचे पथक शेतावर प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करेल.

            शेतकयांनी आवश्यक कागदपत्रांसह रितसर तक्रार दाखल केल्यास प्रकरणावर विनाविलंब कार्यवाही करून शेतकऱ्यांना विहित मुदतीत न्याय मिळण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित