३४ हजारांहून अधिक एकल महिलांचा बचत गटात समावेश ; उमेद अभियानाच्या विशेष मोहिमेला मोठे यश

यवतमाळ, दि.3 (जिमाका) : जिल्हा परिषदच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद अंतर्गत जिल्ह्यातील एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेद्वारे जिल्ह्यातील ३४ हजारांहून अधिक एकल महिलांचा स्वयं-सहाय्यता बचत गटांमध्ये समावेश करण्यात आला असून, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्गही खुला झाला आहे. आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त २३ ते २५ जूनदरम्यान जिल्हाभरात उपजीविका वृद्धी, वैयक्तिक विकास आणि सामाजिक सक्षमीकरण या विषयांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या संकल्पनेतून आणि प्रकल्प संचालक आनंद पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिबिरे यशस्वीपणे पार पडली. या शिबिरांमध्ये उमेद अभियानातील तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, ग्रामसखी तसेच मोठ्या संख्येने एकल महिलांनी सहभाग घेतला. शिबिरांमध्ये विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच उद्योग-व्यवसायात यशस्वी झालेल्या एकल महिलांनी आपले अनुभव मांडले. कमी भांडवलात घरगुती किंवा गावपातळीवर सुरू करता येणाऱ्या व्यवसायांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. बचत गटांमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनासह समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उमेद अभियानांतर्गत अद्याप बचत गटात सहभागी न झालेल्या एकल महिलांचाही ग्रामसखीमार्फत समावेश करण्यात येणार आहे. त्यांना विविध उपजीविका उपक्रमांच्या संधी, आवश्यक प्रशिक्षण आणि प्रभाग संघामार्फत व्यवसाय उभारणीसाठी वित्तीय सहाय्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे. गावपातळीवरील बचत गटात अद्याप सहभागी न झालेल्या एकल महिलांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे आणि प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे यांनी केले आहे. तालुकास्तरीय कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक सारंग आगरकर तसेच जिल्हा व्यवस्थापक स्नेहा खडसे, जितेंद्र मेश्राम, प्रीतम हस्ते आणि सागर वानखडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तालुकानिहाय बचत गटात समाविष्ट एकल महिलांची संख्या : वणी २८३९, दिग्रस २२२२, कळंब २२३९, यवतमाळ २१०९, केळापूर २१९०, घाटंजी २६८७, राळेगाव २०४४, दारव्हा २३१६, नेर १७९५, मारेगाव १५९७, पुसद २४९२, उमरखेड २५०१, बाभूळगाव १५५६ महागाव २७३८, आर्णी १८१२, आणि झरी-जामणी १५०१ इतक्या महिला बचत गटांमध्ये सहभागी झाल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती