भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाभर जनजागृती उपक्रम

 

यवतमाळ, दि. 21 (जिमाका) : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वर्धापन दिनानिमित्त  जिल्ह्यात विविध ठिकाणी भूजल संवर्धन, पाणी गुणवत्ता, सुरक्षित पाण्याचा वापर आणि जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय व जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळा, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर वेदधारिणी विद्यालय, यवतमाळ येथे पाणी अडवा पाणी जिरवा, भूजल वाढवा भविष्य घडवा या घोषवाक्याअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धन आणि पाणी गुणवत्तेबाबत जनजागृती करण्यात आली.

तसेच जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, यवतमाळ येथे विद्यार्थ्यांना भूजलाचे महत्त्व, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळीचे व्यवस्थापन, भूजल पुनर्भरण, संवर्धन तसेच पाण्याच्या अनिर्बंध उपशामुळे होणारे परिणाम याविषयी तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

दारव्हा येथील उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेने जिजामाता कन्या शाळा व महाविद्यालयात पाणी गुणवत्ता तपासणीचे महत्त्व, आवश्यक उपाययोजना आणि पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक सादर केले.

पुसद येथे गुरुकुल विद्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि प्रकल्प आदिवासी विकास कार्यालयात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना भूजल संवर्धन, व्यवस्थापन आणि पाणी गुणवत्तेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छ पाणी  निरोगी जीवन हा संदेश देत सुरक्षित पाण्याचा वापर, पाणी गुणवत्ता आणि भूजल संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.

राळेगाव येथील जिल्हा परिषद शाळा, वाटखेड येथे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना पाण्याची गुणवत्ता, भूजल संवर्धन आणि नियमित पाणी तपासणीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

पांढरकवडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालय, पिंपरी येथे सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा वापर, भूजल पुनर्भरण, नियमित पाणी तपासणी आणि पाणी गुणवत्तेच्या विविध घटकांबाबत माहिती देण्यात आली.

वणी येथील उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेत विस्तार अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना पाणी गुणवत्ता राखण्याच्या कार्यपद्धतीबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हाभर राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे विद्यार्थी, नागरिक आणि विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये भूजल संवर्धन, जलसुरक्षा आणि पाणी गुणवत्तेबाबत जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित