शालेय विद्यार्थ्यांमधील तीरळेपणा निर्मूलनासाठी जिल्ह्यात ‘नयनतारा’ उपक्रम

 

                                         - जिल्हाधिकारी विकास मीना

-शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील तीरळेपणा निर्मूलनासाठी विशेष मोहीम

-मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम

             यवतमाळ, दि. 21 (जिमाका) :  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी यवतमाळ जिल्ह्यात ‘नयनतारा’ हा विशेष आरोग्य उपक्रम राबविण्यात येणार असून, या उपक्रमांतर्गत 5 ते 18 वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांमधील तीरळेपणा निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

            या अभियानात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत वैद्यकीय पथके जिल्ह्यातील शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करतील. तपासणीदरम्यान तीरळेपणाची समस्या असलेले विद्यार्थी ओळखून त्यांना पुढील उपचारासाठी तज्ज्ञांकडे संदर्भित करण्यात येईल.

            उपचारासाठी पात्र ठरणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांवर संपूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून या सर्व शस्त्रक्रिया या यवतमाळ येथेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे नेत्रसेवा प्रतिष्ठान पुणे यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमु मार्फत होणार आहेत.

            या उपक्रमाच्या येणाऱ्या सर्व खर्चासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय (सहकार), यवतमाळ हे आर्थिक साहाय्य देणार असून, त्यांच्या सहकार्यामुळे अभियानास अधिक बळ मिळणार आहे. तीस्केपणावर वेळेत उपचार झाल्यास मुलांची दृष्टी सुधारण्यास, आत्मविश्वास वाढण्यास तसेच शैक्षणिक व सामाजिक विकासास मोठी मदत होते.

 

            मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग तसेच आरबीएसके पथकांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि नागरिकांनी या अभियानास सहकार्य करून विद्यार्थ्यांची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे करण्यात आले आहे.

"नयनतारा" उपक्रमाद्वारे यवतमाळ जिल्हा तीरळेपणामुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून, प्रत्येक विद्यार्थ्याला निरोगी दृष्टी आणि उज्ज्वल भविष्य देण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित