शेतीपूरक जोडधंदा शोधताय? तर मग मधुमक्षिकापालन करा

  ५० टक्के अनुदान मिळणार ; हमीभावाने मध खरेदीची शासनाची सुविधा

 अर्ज प्रक्रिया सुरु

 यवतमाळ, दि. 15 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना अर्थात मधुमक्षिकापालन ही योजना १८ जून २०१९ पासून राज्यभर राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र व्यक्ती तसेच संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शेतकरी, युवक,युवती तसेच संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जीवन बोथीकर यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणुकीच्या तत्त्वावर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. तसेच शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष व छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशांचे संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती तसेच मध व्यवसायासंदर्भातील विविध तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात येते.

 वैयक्तिक मधपाळ घटकासाठी अर्जदार साक्षर असणे आवश्यक असून, स्वतःची शेती असल्यास प्राधान्य दिले जाईल. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे.

 केंद्रचालक (प्रगतीशील मधपाळ) घटकासाठी संबंधित व्यक्ती किमान दहावी उत्तीर्ण असावी.तिचे वय २१ वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.संबंधित व्यक्तीच्या किंवा तिच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर किमान एक एकर शेती अथवा भाडेतत्त्वावर घेतलेली शेती असावी.तसेच लाभार्थ्याकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत इतरांना प्रशिक्षण देण्याची क्षमता आणि आवश्यक सुविधा असणे बंधनकारक आहे.

 केंद्रचालक संस्था घटकासाठी संबंधित संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावावर किंवा भाडेतत्त्वावर किमान एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाची सुयोग्य इमारत उपलब्ध असावी. तसेच मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादन विषयक प्रशिक्षण देण्याची क्षमता संस्थेकडे असणे आवश्यक आहे.

 लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्याबाबत मंडळास बंधपत्र देणे अनिवार्य राहील. तसेच मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे लाभार्थ्यांसाठी बंधनकारक असेल.

योजनेविषयी अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय,यवतमाळ येथे संपर्क साधावा. तसेच निरिक्षक आर.एल.तायडे यांना 07232244791 किंवा 9420771535 या क्रमांकावर संपर्क साधून योग्य मार्गदर्शन घेता येणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, युवकयुवती तसेच संस्थांनी या योजनेचा लाभ घेवून मधुमक्षिकापालन व्यवसायाद्वारे कृषी, फळ, उत्पन्नवाढीची संधी साधावी, असे आवाहन   यवतमाळचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जीवन बोथीकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित