विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

१२५ दिवस रोजगाराची हमी
यवतमाळ, दि.2 (जिमाका) : केंद्र सरकारने “विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी अभियान ग्रामीण अधिनियम (व्हीबी जीरामजी), २०२५” हा कायदा देशातील सर्व ग्रामीण भागात दि. १ जुलैपासून लागू करण्यात आला आहे. या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ गुरुवारी २ जुलै रोजी ग्रामपंचायत कापरा, पंचायत समिती यवतमाळ येथे करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, जिल्हा परिषद कृषी अधिकारी जयसिंग सोळंके, कार्यक्रम व्यवस्थापक अमोल शंभरकर, तसेच ग्रामपंचायत कापरा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सचिव, गावकरी व कर्मचारी उपस्थित होते. योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करताना ग्रामपंचायत कापरा येथे गुरांचा गोठा, जलतारा व सार्वजनिक वृक्ष लागवड या कामांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांना योजनेतील पारदर्शकता, ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबातील प्रौढ सदस्यांना आर्थिक वर्षात १२५ दिवसांच्या अकुशल मजुरी रोजगाराची वैधानिक हमी, ३१८ कामांचा समावेश तसेच नवीन मजुरी दर रुपये ३१७ याबाबत माहिती देण्यात आली. या योजनेमुळे ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढणे, उपजीविकेची सुरक्षितता बळकट होणे, गावस्तरावरील पायाभूत सुविधा निर्माण होणे तसेच शाश्वत ग्रामीण विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती