"कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिंक छळ प्रतिबंधक कायदा विषयी" शिबीर संपन्न

यवतमाळ दि. ३० : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने दि. २८ जुलै रोजी "कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिंक छळ" या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे तर प्रमुख वक्ते म्हणुन अभिषेक मेमोरियल फाउंडेशनच्या सचिव प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार आणि पॅनल वकील सोनाली भोयर यावेळी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार, यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकारने "कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण अधिनियम, २०१३ लागू केला आहे. या कायद्याचा उद्देश प्रत्येक महिलेला कार्यालयात सुरक्षित, सन्मानजनक आणि समतावादी वातावरण मिळवून देणे तसेच लैंगिक छळाच्या घटनांना प्रतिबंध व निवारण करणे आहे. तसेच पॅाश कायद्यानुसार कुठल्याही प्रकारचे अवांछित शारीरिक स्पर्श, लैंगिक स्वरूपाची मागणी किंवा सूचक विनोद, अश्लील दृश्ये, आक्षेपार्ह वर्तन हे लैंगिक छळ म्हणून गणले जाते. हा कायदा सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी, कंपनी, संस्था, शाळा, कॉलेज, कारखाने, दुकान, घर या ठिकाणी लागू असुन प्रत्येक कार्यालयाने १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या अंतर्गत तक्रार समिती (इंटर्नल कम्लेन्टस कमिटी - आयसीसी) स्थापन करणे बंधनकारक आहे. तक्रारदार स्त्री ही तक्रार लेखी स्वरूपात आयसीसी किंवा स्थानिक समितीकडे तीन ते सहा महिन्यांत सादर करू शकते. तक्रारीची गोपनीयता राखली जाते आणि निष्पक्ष तपासणी व गरज असल्यास तात्पुरती उपाययोजना करण्यात येते या कार्यक्रमाचा मुख्य उद्दिष्ट्य कामाच्या ठिकाणी महिलांच्या हक्कांची माहिती देणे, लैंगिक छळ प्रतिबंधक कायदे समजावून सांगणे आणि सुरक्षित कार्यसंस्कृतीचा प्रचार करणे होय, असे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख वक्ते पॅनल वकील सोनाली भोयर यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाकडून मोफत विधी सहाय्य व सल्ला कशा प्राप्त करता येतो याबाबत माहिती दिली. तसेच विधी सेवा प्राधिकरण मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच कुठलाही कायदेशिर सल्ला किंवा मदतीची आवश्यकता वाटल्यास जिल्हा विधी सेवा प्रधिकरण, यवतमाळ येथे संपर्क साधावा असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयाच्या लघुलेखक प्रज्ञा डुकरे यांनी केले. या कार्यक्रमाकरीता मोठ्या प्रमाणात कर्मचारी उपस्थित होते. 000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान