सातही विधानसभा मतदारसंघात आजपासून महाराजस्व समाधान शिबीर
- महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र वाटप होणार
- नागरिकांना
योजनांचा लाभ एकाच छताखाली
यवतमाळ, दि. 21 (जिमाका) : राज्य शासनाने महसूल विभाग अधिक लोकाभिमुख पारदर्शक व गतिमान करण्यासाठी
महसूल विभागातील सेवेतील लाभ तळागाळाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यासाठी छत्रपती
शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर त्याचाच दुसरा
टप्पा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा
जन्मदिवस व माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून
जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात दि. 22 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत छत्रपती
शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी त्याचा लाभ
घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
राज्य शासनाने महसूल विभाग अधिक लोकाभिमुख पारदर्शक व गतिमान करण्यासाठी
महसूल विभागातील सेवेतील लाभ तळागाळाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यासाठी शासन
नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. या शिबिरांतर्गत नागरिकांना शासनाच्या उपक्रम व योजनांचा
लाभ देण्यात येणार आहे. त्यामध्ये महिलांना
शेतकरी दर्जा देण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार
आहे. तसेच गावठाणातील नागरिकांना स्वामित्व देण्याची सनद वाटप करणे, मुख्यमंत्री बळीराजा
शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, तुकडेबंदी
कायद्याच्या अंमलबजावणीसाठी "स्थानिक क्षेत्र" घोषणा, जिवंत सातबारा मोहीम, सिंधी विस्थापितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनी
फ्री-होल्ड करण्यासाठी विशेष अभय योजना-2025 ला एक वर्ष मुदतवाढ, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनेच्या
लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद, कुंभार समाजातील व्यक्तींना पारंपारिक व्यवसायासाठी सवलती,
शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील "नोंदणी फी" पूर्णपणे माफी इत्यादी
योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
या महाराजस्व समाधान शिबिरांच्या अनुषंगाने तयारीबाबत जिल्हा प्रशासनाने
परिपत्रक काढले आहे. त्यानुसार समाधान शिबिरामध्ये विहीत कालावधीत कार्यवाही करुन लाभार्थ्यांना
लाभ देण्याबाबत व सर्व शिबीर उत्साहपूर्वक व यशस्वीपणे पार पाडण्याचे निर्देश देण्यात
आलेले आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय
आयोजन :
यवतमाळ जिल्ह्यात सातही विधानसभा मतदारसंघात महाराजस्व समाधान शिबीर
आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानुसार यवतमाळ विधानसभा मतदारसंघात 22 जुलै रोजी पोस्टल
ग्राउंड, यवतमाळ, आर्णी विधानसभा मतदारसंघात 22 जुलै रोजी सुपुनाथ मंगल कार्यालय घाटंजी,
राळेगाव विधानसभा मतदारसंघात 25 जुलै रोजी रॉयल पॅलेस कळंब, दिग्रस विधानसभा मतदारसंघात
26 जुलै रोजी जाधव कॉटन जिनिंग, जुना दिग्रस
रोड दारव्हा, उमरखेड विधानसभा मतदारसंघात 26 जुलै रोजी राजस्थानी भवन उमरखेड, पुसद
विधानसभा मतदारसंघात 30 जुलै रोजी अग्रवाल मंगल कार्यालय पुसद, वणी विधानसभा मतदारसंघात
31 जुलै रोजी एसबी लॉन वणी येथे महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.
हे शिबिर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी
दिली. तसेच जिल्ह्यातील शेतकरी, महिला व नागरिकांनी या शिबिरात सहभागी होवून सेवांचा
लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी केले.




Comments
Post a Comment