जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रति हेक्टर 24 हजार रुपये अनुदान

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

                          शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

यवतमाळ दि. 20 (जिमाका): एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2026-27 मध्ये जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांचे  उत्पादकता कमी होत असल्याचे दिसून येत असून, त्यामागे योग्य मशागत पद्धती, नांग्या न भरणे, खत व कीडनाशकांचा अपुरा वापर, तसेच झाडांची व्यवस्थित आकार न देणे (दाट व गर्द छत्राकृती रचना) ही प्रमुख कारणांमुळे उत्पादकता कमी होत आहे.

  नवीन लागवडीबरोबरच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे हे जिल्ह्याच्या एकूण फळ उत्पादन वाढीसाठी अत्यंत आवश्यक मानले जात आहे. याच उद्देशाने जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन कार्यक्रम राबविण्यात येत असून, यात आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, पेरू, आवळा आणि लिंबू या प्रमुख फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.

  या योजनेअंतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी 60 हजार रुपये प्रति हेक्टर इतका प्रकल्प खर्च ग्राह्य धरला जाईल. त्यावर 40 टक्के प्रमाणे, म्हणजेच जास्तीत जास्त 24 हजार  रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येणार आहे. ही मदत किमान 0.20 हेक्टर ते कमाल 2 हेक्टर क्षेत्रासाठी लागू राहील.

 चौकट

 पुनरुज्जीवनासाठी पात्र ठरणाऱ्या फळपिकांच्या बागांचे वयही निश्चित करण्यात आले आहे.  त्यानुसार आंबा 20 ते 70 वर्षे, चिकू 25 ते 50 वर्षे, संत्रा 10 ते 25 वर्षे, मोसंबी 10 ते 15 वर्षे, पेरू 15 ते 40 वर्षे, आवळा 15 ते 35 वर्षे आणि लिंबू 10 ते 20 वर्षे या वयोगटातील बागांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

 या योजनेचा जास्तीत जास्त जास्त शेतकऱ्यांनी  लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.in  वर फलोत्पादन घटकाखाली अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधवा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे  यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित