एमसीईडीतर्फे सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोफत कौशल्याधारित उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन
यवतमाळ, दि.3 (जिमाका) : जिल्हा उद्योग केंद्र, यांच्याद्वारे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यवतमाळ यांच्या वतीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवकयुवती व पुरुषांकरिता एक महिन्याच्या कालावधीचे विविध कौशल्यांवर आधारित मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
प्रशिक्षणामध्ये विविध तांत्रिक ज्ञान प्रात्यक्षिकांसह दिले जाणार असून उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, उद्योग-व्यवसायाच्या संधी, उद्योग उभारणीची प्रक्रिया, बाजारपेठ सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योगांसाठी आवश्यक नोंदणी व परवाने तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पात्रता काय ?
या प्रशिक्षणासाठी अर्जदार यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक असून त्याचे वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे.
कागदपत्रे कोणती लागतात ?
प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला (टीसी), शैक्षणिक गुणपत्रिका, जातीचा दाखला, पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तसेच बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रती सादर कराव्या लागतील.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र व विद्यावेतन
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र तसेच विद्यावेतन देण्यात येणार आहे.
संपर्क कुठे करायचा ?
इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), उद्योग भवन, तिसरा मजला, दारव्हा रोड, यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

Comments
Post a Comment