आकांक्षित तालुक्यांसाठी ‘नीती तारा’ डिजिटल प्लॅटफॉर्म
जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांना
क्षमता विकास व अभिमुखता प्रशिक्षण
यवतमाळ
दि. 24 (जिमाका):
नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत
जिल्ह्यातील पुसद आणि झरीजामणी या तालुक्यांचा समावेश आहे. या आकांक्षित तालुक्यांत
‘विकसित भारत’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी
डेटा-आधारित नियोजन, प्रभावी आढावा आणि रिअल-टाइम कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी नीती
आयोगाने ‘नीती तारा’ हे तंत्रज्ञान-सक्षम प्रशासन
सहाय्य व्यासपीठ (टूलकिट) विकसित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा व तालुकास्तरावरील
अधिकाऱ्यांसाठी क्षमता विकास व अभिमुखता प्रशिक्षण कार्यक्रम शुक्रवारी, दि. २४ जुलै
रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे संपन्न झाला.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी
विकास मीना, उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांच्यासह
विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, पुसद व झरी
जामणी येथील गटविकास अधिकारी, आकांक्षित ब्लॉक फेलोज, इतर जिल्हा व तालुकास्तरावरील
अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा व तालुका स्तरावरील नियोजन, देखरेख,
प्रगतीचे पुनरावलोकन आणि माहितीचे प्रभावी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने
हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये अधिकाऱ्यांना नीती तारा प्रणालीचे
प्रात्यक्षिक, प्रत्यक्ष प्रशिक्षण, कार्यात्मक वापर, उपकरणांचे संचालन, सामग्रीचा
वापर तसेच प्रशासकीय पुनरावलोकन प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला विविध विभागांच्या अधिकारी
व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून प्रशिक्षण घेतले.
या प्रशिक्षण सत्रादरम्यान जिल्हाधिकारी
विकास मीना यांनी सार्वजनिक प्रशासनात डेटा-आधारित व पुराव्यावर आधारित नियोजनाचे महत्त्व
अधोरेखित केले. त्यांनी सर्व जिल्हा व तालुका अधिकाऱ्यांना नीती तारा प्लॅटफॉर्मचा
प्रभावी वापर करून प्रशासकीय कार्यक्षमता वाढविणे, सुशासनाचे परिणाम सुधारणा करणे आणि
सर्वसमावेशक व शाश्वत विकासासाठी निर्णय प्रक्रिया सुलभ करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे संचालन नीती तारा प्रशिक्षक
पराग गुंटीवार यांनी केले.



Comments
Post a Comment