20 जुलैपर्यंत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेसाठी विशेष मोहीम

  यवतमाळ, दि.16 (जिमाका) : केंद्र शासनाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत  जिल्ह्यात 20 जुलैपर्यंत विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था तसेच इतर पात्र लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

 आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत ऑगस्ट 2020 पासून सुरू असलेल्या या योजनेद्वारे पीक काढणीनंतरच्या कृषी पायाभूत सुविधा तसेच सामुदायिक शेतीसाठी आवश्यक प्रकल्प उभारणीसाठी सवलतीच्या व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे शेतमालाची साठवणूक, प्रक्रिया, मूल्यवर्धन, वाहतूक आणि विपणनाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे.

या योजनेअंतर्गत बँकांकडून मंजूर होणाऱ्या दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर तीन टक्के व्याज सवलत तसेच पतहमी क्रेडिट गॅरंटी सुविधा दिली जाते. गोदामे, शीतगृहे, पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कृषी लॉजिस्टिक, सायलो, रायपनिंग चेंबर, ई-मार्केट सुविधा, जैव इनपुट उत्पादन केंद्र आणि कस्टम हायरिंग सेंटर यांसारख्या कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते.       

वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, प्राथमिक कृषी पतसंस्था, सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप, स्वयंसहायता गट तसेच कृषी क्षेत्रातील इतर पात्र संस्थांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

विशेष मोहिमेदरम्यान जिल्हाभर जनजागृती अभियान, शेतकरी मेळावे, कार्यशाळा, बँक समन्वय बैठका आणि लाभार्थी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आत्मा कार्यालय, कृषी विभाग किंवा जवळच्या राष्ट्रीयीकृत अथवा अनुसूचित बँकेशी संपर्क साधावा. तसेच कृषी पायाभूत सुविधा उभारणीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित