हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या योगदानामुळे महाराष्ट्र कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण
जिल्हाधिकारी विकास मीना यांचे गौरवोद्रार
यवतमाळात कृषी दिन उत्साहात साजरा
हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना जयंतीदिनी अभिवादन
उल्लेखनीय कार्याबद्दल शेतकऱ्यांचा गौरव
यवतमाळ, दि.१ (जिमाका) : हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या योगदानामुळे आज देश आणि महाराष्ट्र हा कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी विकास मीना यांनी काढले.
कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सिंजेन्टा इंडिया प्रा.लि.च्या सीएसआर उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेतील वसंतराव नाईक सभागृहात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विकास मीना, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रकल्प संचालक आनंद पिंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे, कृषी विकास अधिकारी एल. जी. आडे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. अमरशेट्टीवार, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रदीप कच्छवे, सिंजेन्टा इंडिया प्रा. लि.चे प्रतिनिधी चिदंबरम फडणीस यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी जिप परिसरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी विकास मीना यांनी वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण कार्याचा गौरव करताना आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्थापन आणि माहितीच्या प्रभावी वापरावर भर दिला. "आज माहितीचे युग आहे. ज्या शेतकऱ्याकडे योग्य माहिती असेल तो अधिक सक्षमपणे निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे 'महाविस्तार' ॲपसह विविध माध्यमांतील शेती विषयक माहितीचा वापर करून शेतकऱ्यांनी स्वतः सक्षम व्हावे," असे आवाहन त्यांनी केले.
शेतीत उत्पादनाबरोबरच उत्पन्न वाढविण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग, पूरक व्यवसाय आणि नियोजनबद्ध शेतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या पार्श्वभूमीवर शेतीतील महिलांच्या योगदानाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.
खत व बियाण्यांच्या वितरणावर लक्ष असून अवैध खत विक्री आणि बियाणे लिंकिंगवर कठोर कारवाई सुरू असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना खत-बियाण्यांची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी वसंतराव नाईक यांच्या कृषी आणि ग्रामीण विकासातील योगदानाची माहिती देत आधुनिक शेतीत दर्जेदार बियाणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीनुसार आज स्मार्ट शेती, कृषी विस्तार, पूरक व्यवसाय आणि शेती अर्थव्यवस्थेच्या योग्य नियोजनामुळे शेती क्षेत्र उद्योग म्हणून विकसित होऊ शकते, असे सांगितले. तसेच वसंतराव नाईक यांचा कृषी विकासाचा वारसा पुढील पिढीने जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रदीप कच्छवे यांनी भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरीच्या सुमारे ९० टक्के पावसाची शक्यता व्यक्त करत एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पीक नियोजन, पेरणी, सिंचन व्यवस्थापन, फवारणी आणि किड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सिंजेन्टा इंडिया प्रा. लि.चे प्रतिनिधी चिदंबरम फडणीस यांनी प्रशासनासोबत कृषी विकासासाठी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त करत जिल्ह्यातील २० हजार शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण प्रशिक्षणासह विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.
प्रास्ताविकात कृषी विकास अधिकारी एल. जी. आडे यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्य व शासकीय कृषी योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार प्रदर्शन मोहीम अधिकारी प्रवीण जाधव यांनी केले.
उल्लेखनीय कार्याबद्दल शेतकऱ्यांचा सत्कार
यावेळी पीक स्पर्धेतील विजेते, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



Comments
Post a Comment