छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर

 

कळंब येथे २५ जुलै रोजी नागरिकांनी लाभ घ्यावा  प्रशासनाचे आवाहन

यवतमाळ, दि. 21 (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ अभियान राबविण्यात येत आहे. राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी विशेष शिबिराचे आयोजन शनिवार, दि. २५ जुलै  रोजी सकाळी १० वाजता रॉयल पॅलेस मंगल कार्यालय, राळेगाव चौफुली, कळंब येथे करण्यात आले आहे.

आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या शिबिरात राळेगाव, कळंब, बाभुळगाव व पांढरकवडा तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, योजनांची माहिती, अर्ज स्वीकारणे तसेच अनेक महसूल व प्रशासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

शिबिरामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र वितरण, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषणा, जिवंत सातबारा मोहीम, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनेतील विशेष तरतुदी, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत तात्काळ सेवा, कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायासाठी सवलती, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क माफी, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचे वितरण करण्यात येणार आहे.

याशिवाय महसूल, आरोग्य, पंचायत समिती, नगर पंचायत, कामगार कल्याण विभागासह विविध शासकीय विभागांचे स्टॉल, मदत व माहिती केंद्र उभारण्यात येणार असून, नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

प्रशासन अधिक लोकाभिमुख करून नागरिकांची प्रलंबित महसुली व इतर शासकीय कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित