जिल्हा सैनिक कार्यालयात आजी-माजी सैनिक व वीरमाता-वीरपत्नींसाठी कायदेविषयक शिबिर

यवतमाळ, दि. 2 (जिमाका) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे वीर परिवार सहाय्यता योजना-२०२५ अंतर्गत सेवारत सैनिक, माजी सैनिक, सैनिक विधवा, वीरमाता, वीरपत्नी, त्यांची मुले तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी २९ जून रोजी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दिपक एच. दाभाडे, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अरविंद धनविजय, कल्याण संघटक भगवान रेडेकर तसेच माजी सैनिक संघटनाचे अध्यक्ष विनोद आरेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रांगणात सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण दिपक एच. दाभाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण संघटक भगवान रेडेकर यांनी केले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दिपक एच. दाभाडे यांनी आजी-माजी सैनिक, सैनिकांच्या पत्नी, वीरमाता व वीरपत्नी यांना विविध कायदेविषयक बाबी, नागरिकांचे हक्क, शासकीय योजनांचा लाभ, तसेच न्यायप्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सैनिकांच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची कायदेशीर मदत आवश्यक असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ येथे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कायदेविषयक सेवा कक्ष लीगल एड क्लिनिक मार्फत नियुक्त पॅनेल वकिलांकडून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कल्याण संघटक भगवान रेडेकर यांनी केले. शिबिराला आजी-माजी सैनिक, वीर कुटुंबीय आणि सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती