कांदाचाळ व लसूण साठवणूक गृह प्रकल्पासाठी कृषी विभाग देणार ५० टक्के अर्थसहाय्य

 

- महाडीबीटी पोटलवर अर्ज करण्याचे आवाहन

        यवतमाळ, दि.24 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२६-२७ च्या काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत कमी खर्चाचे कांदाचाळ किंवा लसूण साठवणूक गृह उभारणीचा घटक राबविण्यात येत आहे.

             राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असताना अनेक शेतकरी कांदा जमिनीवर पसरवून किंवा पारंपरिक चाळीत साठवतात, त्यामुळे कांदा सडण्याचे प्रमाण वाढते तसेच गुणवत्तेवर व टिकाऊपणावर विपरीत परिणाम होतो. यासाठी शास्त्रशुद्ध कांदाचाळ उभारणी केल्यास कांद्याची गुणवत्ता टिकून राहते व शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळू शकतो.

            एकात्मिक फलोत्पादन विकास  या योजनेअंतर्गत ५ ते २५ मेट्रिक टन, २५ ते ५०० मेट्रिक टन व ५०० ते १००० मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाळ/लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. प्रकल्प खर्च ३० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास बँक कर्ज अनिवार्य असून अनुदान हे बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात देण्यात येणार आहे.

 

            कमी खर्चाचे कांदाचाळ किंवा लसूण साठवणूक गृह प्रकल्प उभारणी खर्चाच्या मापदंडानुसार सर्वसाधारण व अनूसुचित क्षेत्रासाठी ८ हजार रुपये प्रति मेट्रिक टन प्रमाणे ५ ते १००० मेट्रिक टन क्षमतेनुसार ग्राह्य भांडवली खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. त्यानुसार ५ ते २५ मे.टन क्षमतेसाठी ८ हजार रुपये प्रति मे.टन प्रमाणे प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के म्हणजे ४ हजार रुपये प्रति मे.टन अनुदान देय आहे. २५ ते ५०० मे.टन क्षमतेसाठी ७ हजार रुपये प्रति मे.टन प्रमाणे प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के म्हणजे ३ हजार ५०० रुपये प्रति मे.टन अनुदान, तर ५०० ते १००० मे.टन क्षमतेसाठी ६ हजार रुपये प्रति मे.टन प्रमाणे प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के म्हणजे ३ हजार रुपये प्रति मे.टन अनुदान देण्यात येणार आहे.

 

लाभार्थी पात्रता निकष :   

 शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत अर्ज करतांना त्याच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे कांदापिक असणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट,  शेतकऱ्यांचे उत्पादक संघ नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल.

             काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात कांदाचाळ किंवा लसूण साठवणूक गृह या घटकाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन घटकाखाली अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित