मानव-वन्यजीव संघर्षातील बाधितांना मदत; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची उल्लेखनीय कामगिरी
यवतमाळ, दि. 23 (जिमाका) : मानव आणि वन्यजीव संघर्षामुळे बाधित झालेल्या नागरिकांना वेळेत न्याय, आर्थिक नुकसानभरपाई आणि पुनर्वसनाचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने ‘मानव-वन्यजीव संघर्षातील बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठीची योजना-२०२५’ देशभरात लागू केली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती, वन विभाग, महसूल प्रशासन आणि इतर शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून थेट गावपातळीवर कार्यरत झाली आहे.
मानव-वन्यजीव
संघर्षामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील शेतकरी, शेतमजूर तसेच आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकांवर गंभीर परिणाम होत असून अशा घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना
वैद्यकीय उपचार, प्रशासकीय मदत आणि वन विभागामार्फत नुकसानभरपाई मिळणे आवश्यक
ठरते. महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील बाधितांना नुकसान भरपाई व ३०
दिवसांच्या आत कार्यवाहीची तरतूद असल्याने बाधितांना तातडीने दिलासा मिळणे
अपेक्षित आहे.
मागील दोन महिन्यांत
जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये मानव-वन्यजीव संघर्षाच्या चार घटना घडल्या असून
त्यामध्ये पाच जण बाधित झाले आहेत. बाधितांमध्ये दोन महिला, तीन पुरुष तसेच दोन
आदिवासी बांधवांचा समावेश असून सर्वजण शेती व्यवसायावर अवलंबून आहेत.
मानव-वन्यजीव संघर्ष
बाधितांना पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई
प्रमुख जिल्हा व सत्र
न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आनंद एल. यावलकर यांच्या
मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी (एचडब्ल्यूसी-२०२५) तथा पॅरा विधी स्वयंसेवक, जिल्हा
विधी सेवा प्राधिकरण, वासुदेव विधाते यांनी सातत्याने पाठपुरावा करून तीन
बाधितांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई मिळवून दिली आहे.
उर्वरित दोन प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुरू आहे.
२७ मे २०२६
रोजी घाटंजी तालुक्यातील पार्टी (नस्करी) तांडा येथील झालाबाई उत्तम जाधव आणि
तारासिंग उत्तम जाधव यांच्यावर अस्वलाने हल्ला केला होता. दोघांवर यवतमाळ येथील
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले असून वन विभागामार्फत
त्यांच्या खात्यात प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्यात आली. तसेच
१६ जून रोजी महागाव तालुक्यातील शिवाजी दिगांबर खराटे यांच्यावर अस्वलाने
हल्ला केला होता त्यांनाही उपचारानंतर वन विभागामार्फत पाच लाख रुपयांची भरपाई
मिळाली.
२७ जून २०२६
रोजी वणी तालुक्यातील देविदास यशवंत सोयाम यांच्यावर जंगली डुकराने
हल्ला केला. त्यांच्यावर चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात
उपचार झाले असून आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्याने नुकसान भरपाईचा प्रस्ताव अद्याप
प्रलंबित आहे. ९ जुलै २०२६ रोजी राळेगाव तालुक्यातील रेखा विठ्ठल टेकाम यांच्यावर जंगली
डुकराने हल्ला केला. त्यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात
उपचार करण्यात आले असून, बँक खाते व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुरू असल्यामुळे
नुकसान भरपाईची कार्यवाही प्रलंबित आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित
कार्यालयांशी समन्वय साधून आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत बाधितांना मदत करण्यात येत आहे.
जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणाचे सचिव दीपक दाभाडे यांच्या या कार्यवाहीमुळे मानव-वन्यजीव संघर्षातील
बाधितांना तातडीचा आर्थिक दिलासा मिळण्याबरोबरच शासनाच्या विविध मदत योजनांचा लाभ
वेळेत मिळवून देण्याच्या दृष्टीने मदत होत आहे. मानव-वन्यजीव संघर्ष बाधितांच्या
पुनर्वसनासाठी, वैद्यकीय खर्चासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण, यवतमाळ सदैव तत्पर राहील, अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणाचे नोडल अधिकारी तथा पॅरा विधी स्वयंसेवक वासुदेव विधाते यांच्याशी
संपर्क साधण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.
Comments
Post a Comment