खरीप हंगाम पीक स्पर्धेत ५ ते ५० हजार रुपयांपर्यंत बक्षीसे शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
यवतमाळ दि. 29 : अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात येत आहेत. पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे.
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप हंगाम मधील एकूण ११ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर स्पर्धकांची निवड होणार आहे. पिकस्पर्धेतील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल ही खरीप पीके आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या स्वतःच्या शेतावर भात पिकासाठी किमान २० गुंठे तसेच उर्वरित पिकांसाठी किमान ४० गुंठे क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी फार्मर आय डी, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), बँक खाते चेक, पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे.
अर्ज दाखल करण्याची खरीप हंगामासाठी अंतीम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै २०२६ व भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुलासाठी ३१ ऑगस्ट २०२६ आहे.
पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क तीनशे रुपये तर आदिवासी गटासाठी दिडशे रुपये राहील. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी बक्षिसाचे स्वरुप तालुका पातळीवर पहिले बक्षिस 5 हजार रुपये, दुसरे बक्षिस 3 हजार व तिसरे बक्षिस 2 हजार रुपये आहे. जिल्हा पातळीवर पहिले बक्षिस 10 हजार, दुसरे बक्षिस 7 हजार, तिसरे बक्षिस 5 हजार रुपये आहे. राज्य पातळीवर पहिले बक्षिस 50 हजार, दुसरे बक्षिस 40 हजार व तिसरे बक्षिस 30 हजार रुपये राहील.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेत सहभागी होण्याकरिता कृषी विभागाच्या संकेतस्थळावर http://krishi.maharashtra.gov.in "पीक स्पर्धा नोंदणी" टॅबवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. पिकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
000
Comments
Post a Comment