'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' अंतर्गत महसूल शिबिर उत्साहात संपन्न


       
 यवतमाळ, दि. 22 (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस व दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ तहसील कार्यालय महसूल विभागाअंतर्गत पोस्टल ग्राऊंड, यवतमाळ येथे आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत तालुकास्तरीय महसूल शिबीर उत्साहात पार पडले.

            या शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब मांगुळकर उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्षा डॉ.प्रियदर्शनी उईके, उपाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नगरसेवक नितीन गिरी, नगरसेवक बिपिन चौधरी तसेच चिंतामण पायघन, शामभाऊ जयस्‍वाल, शिबीर समन्‍वयक सचिन भेडेकर, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने हजारो नागरिक उपस्थित होते.

                        कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' या शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची उद्दिष्टे, नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यामागील हेतू, तसेच महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी नागरिकांनी या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले.

            कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व सामाजिक संदेश देणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यानंतर आयोजित कृषी संवाद सत्रात प्रगतशील शेतकरी निलेश टाके (रा.गोधणी) यांनी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती व आधुनिक कृषी पद्धतींचे अनुभव विषद केले.

            यानंतर मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत व पारदर्शक पद्धतीने पोहोचविण्यासाठी महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचे महत्त्व विशद केले. नागरिकांनी शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा तसेच आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करून विविध योजनांचा लाभ मिळवावा, असे आवाहन करण्यात आले.

            शिबिरामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी एकूण २२ विभागांचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये कृषी विभाग, पंचायत समिती, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख विभाग, महसूल विभाग, महिला व बालविकास विभाग, नगर परिषद, पशुसंवर्धन विभाग, कामगार कल्याण विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, वन विभाग, महावितरण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, डाक विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), बचत गट, निबंधक कार्यालय, सार्वजनिक वितरण प्रणाली (पुरवठा विभाग), समाज कल्याण विभाग, सेतू सुविधा केंद्र तसेच आधार सेवा केंद्र यांचा सहभाग होता. सदर विभागां मार्फत विविध लाभ देण्‍यात आलेले आहे. त्यामध्ये  राष्‍ट्रीय कुंटुब लाभ योजनेमधील ३ लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप, एका शेतकरी आत्‍महत्‍या कुटुंबाच्‍या वारसाना धनादेश वितरित करण्सात आले. संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना १२० लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप,  ९ लाभार्थी दिव्‍यांग कुटुंबियांना शिधापत्रिका वाटप,  महसूल विभागामार्फत सातबारा, फेरफार, ८ अ व उत्पन्न दाखले असे एकूण १०२० दाखले वाटप करण्यात आले.  महिला बालकल्याण विभागाच्या दोन लाभार्थी,  १२० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्‍यात आली. लोकवगर्णीमधून सायकल व नोटबुक, दप्‍तर वाटप, ५० दप्‍तर व नोटबुक वाटप व सायकल ६ वाटप, २२६३ सेतु दाखले, विशेष सघन पुनरीक्षण अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीएलओ यांना उत्कृष्ट कार्याबद्दल एकूण ३५ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

 

तसेच ५ लाभार्थींना रमाई आवास योजनेचा लाभ, १० लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ, २० महिला बचत गट यांना अर्थसहाय वाटप,  कामगार कल्‍याण विभागामार्फत ४१ स्‍मार्ट कार्ड वाटप, ५० लाभार्थींना निवासी अतिक्रमण जमीनीचे पट्टे वाटप करण्यात आले.

            तसेच, विविध शासकीय विभागांमार्फतही पात्र लाभार्थींना विविध शासकीय योजना व सेवांचा लाभ प्रदान करण्यात आला.

            महसूल विभागामार्फत शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, गावठाण स्वामित्व सनद, जिवंत सातबारा अभियान, अतिक्रमण नियमितीकरण, विविध महसुली दाखले, जात, उत्पन्न, रहिवासी प्रमाणपत्रे, नोंदणी शुल्क माफी, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना तसेच इतर विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन व अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करून आवश्यक मार्गदर्शन केले तसेच अनेक प्रकरणांमध्ये जागेवरच सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.

            शिबिरास तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून महसूल व इतर शासकीय विभागांकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेवांचा लाभ घेतला. एकाच ठिकाणी विविध विभागांच्या सेवा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

            कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तहसील कार्यालय, यवतमाळ, महसूल विभाग, नगर परिषद, यवतमाळ तसेच सहभागी सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कार्य करून शिबिर यशस्वीरीत्या पार पाडले.


Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित