निर्यातक्षम फळे व भाजीपाला बागांच्या ‘हॉर्टीनेट’ नोंदणीसाठी विशेष मोहीम
यवतमाळ, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला पिकांची गुणवत्ता जागतिक दर्जाची राखून शेतमाल निर्यातक्षम करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात 'हॉर्टीनेट' ऑनलाइन ट्रेसिबिलिटी प्रणालीद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यासाठी जिल्हानिहाय लक्षांक निश्चित करण्यात आले आहेत. त्यासाठी नोंदणीसाठी प्रक्रिया सुरु झाली आहे.
सध्या जागतिक तसेच स्थानिक बाजारपेठेत कीटकनाशकांच्या उर्वरित
अंशाबाबत मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली आहे. केंद्र शासनाच्या
"सुरक्षित अन्न पिकवा" मोहिमेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून,
युरोपियन देशांमध्ये शेतमाल निर्यातीसाठी कीटकनाशक उर्वरित अंशमुक्त उत्पादन
बंधनकारक असल्याने, अपेडा यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
राबविण्यात येत आहे.
राज्यात द्राक्षासाठी ग्रेपनेट, आंब्यासाठी मॅंगोनेट, डाळिंबासाठी
अनारनेट, भाजीपाल्यासाठी व्हेजनेट, संत्रा व लिंबूवर्गीय पिकांसाठी सिट्रसनेट,
कांद्यासाठी ओनियननेट तसेच इतर फळपिकांसाठी ऑदरफ्रुटनेट या ऑनलाइन प्रणाली कार्यरत
आहेत.
चालू वर्षासाठी नोंदणीचा कालावधी निश्चित करण्यात आला असून,
ग्रेपनेट अंतर्गत द्राक्ष बागांची नोंदणी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२६, मॅंगोनेट
अंतर्गत आंबा बागांची नोंदणी १ ऑक्टोबर २०२६ ते १ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार
आहे. तर अनारनेट, व्हेजनेट, सिट्रसनेट, ओनियननेट आणि ऑदरफ्रुटनेट अंतर्गत नोंदणी
वर्षभर सुरू राहणार आहे.
जिल्ह्यातील सर्व फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातक्षम
शेतमालाच्या नोंदणीसाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधून 'हॉर्टीनेट'
प्रणालीवर आपल्या बागांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment