सहावीच्या प्रवेशासाठी नवोदयची 28 नोव्हेंबरला निवड चाचणी

                                         अर्ज प्रक्रिया सुरू ; 31 जुलैपर्यंत मुदत

            यवतमाळ, दि. 22 (जिमाका) : घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे शैक्षणिक वर्ष 2027-28 मध्ये इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2027 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै  असून शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता पाचवीत शिकत असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.

            या प्रवेशासाठीची निवड चाचणी  28 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज https://cbseitms.rcil.gov.in/nvs किंवा www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरावेत. तसेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्यूआर कोडद्वारेही अर्ज करता येणार आहे.

पात्रता:

            निवड चाचणीसाठी अर्ज करणारा विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी असावा. तसेच तो यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय किंवा शासनमान्य शाळेत शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असावा. विद्यार्थ्याने 2024-25, 2025-26 आणि 2026-27 या सलग तीन शैक्षणिक वर्षांत अनुक्रमे इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवीचे शिक्षण नियमितपणे पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2015 पूर्वी आणि 31 जुलै 2017 नंतर झालेला नसावा. म्हणजेच जन्मतारीख 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 दोन्ही दिवसांसह या कालावधीत असणे आवश्यक आहे.

आरक्षण:

            प्रवेश प्रक्रियेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी 75 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच एक तृतीयांश जागा मुलींसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय ओबीसी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या नियमानुसार आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रे:

            ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्याचा फोटो, विद्यार्थी व पालकांची स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड उपलब्ध नसल्यास सरकारी अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले पालकांचे रहिवासी प्रमाणपत्र सादर करावे. आवश्यकतेनुसार जातीचा दाखला जोडावा. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय जातीचे प्रमाणपत्र लागेल.

            अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय, बेलोराचे प्राचार्य पी. आर. चाफले यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित