स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांचा अभिमान - नगराध्यक्ष ॲड. मोहिनीताई नाईक यांचे गौरवोद्गार

  

> माविमद्वारा आयोजित १६ वी सर्वसाधारण वार्षिक सभा व महिला मेळावा उत्साहात

> महिला बचत गटांनी पुसद तालुक्यात व्यवसाय सुरु करण्याचे आवाहन :

 

यवतमाळ,दि. १ (जिमाका) : शासकीय योजनांचा लाभ घेवून स्वत:चा व्यवसाय सुरु करणाऱ्या पुसद तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार पुसद नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष ॲड. मोहिनीताई नाईक यांनी काढले.

पुसदमधील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुधाकर नाईक प्रेक्षागृहात महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्रांच्या वतीने १६ वी सर्वसाधारण वार्षिक सभा व महिला मेळावा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष ॲड. मोहिनीताई नाईक बोलत होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अतुल इंगळे, प्र.जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, आदिवासी विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी कोटूरवार, बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, पुसद रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय ठाकरे, केंद्राच्या अध्यक्ष, पदाधिकारी आदी मान्यवर व्यासपठावर उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक म्हणाल्या की
, पुसद तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला विशेषतः आदिवासी महिला शासनाच्या योजनांचा लाभ घेवून विविध व्यवसाय सुरु करत असल्याचा अभिमान आहे. पुसदमध्ये उद्योग वाढले पाहिजे हा राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांचा नेहमीच आग्रह असतो. त्यादृष्टीने तालुक्यात उद्योग वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. महिलांना उद्योग उभारण्यासाठी शासनाचे अनेक प्रकल्प व योजना राबविल्या जात आहेत, त्याचा लाभ महिलांनी घेतला पाहिजेत. अनेक महिलांनी संघर्षातून स्वत:चे व्यवसाय सुरु केले असून ते हिम्मतीचे उत्तम उदाहरण आहे. पुसदमध्ये दुग्धव्यवसायाला वाव असून डेअरी कॉलेजच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध आहे. पुसदमध्ये अनेक क्षेत्रात व्यवसाय सुरु करण्याची संधी आहे. त्यामुळे संघटित होवून तालुक्यातील माविम, उमेद, आदिवासी विकास, कृषी इ. विभागांतर्गत असलेल्या महिला बचत गटांनी पुसद तालुक्यात जास्तीत जास्त व्यवसाय सुरु करावे. लोक संचालित साधन केंद्र पुसद करीत असलेल्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या या प्रयत्नामुळे पुसद तालुका आर्थिकदृष्या सक्षम होईल, असे आवाहन त्यांनी केले. तसेच महिला व बाल विकास विभागाची निर्मिती माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी केल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

 


उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल म्हणाले,  सध्या जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेची माहिती देवून जास्तीत जास्त महिलांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले.  पुढच्या आठवड्यात पुसदमध्ये आयोजित महाराजस्व समाधान शिबिरात महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी स्टॅाल उभारावे. तसेच महिला बचत गटाच्या उत्पादनांसाठी हक्काची बाजारपेठ मिळावी यांसाठी अमरावतीतील मेळघाट मॉलच्या धर्तीवर पुसदमध्ये  मॉलप्रस्तावित आहे. त्यासाठी जागेची पाहणी सुरु आहे. निधी सुद्धा मिळेल. हा प्रकल्प लवकरच होईल, असे ते म्हणाले.

पुसद तालुक्यात दुध उत्पादन कमी असल्याने बाहेरुन आयात करावी लागते. त्यामुळे महिला बचत गटांनी दुग्धव्यवसायाकडे वळले पाहिजे. गुजरातच्या अमुलला तेथील महिला बचत गटांद्वारे दुध पुरवठा केला जातो. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल केली जात आहे. त्याच धर्तीवर पुसदमधील महिलांनी एकत्र येवून दुग्धव्यवसाय केल्या मोठा फायदा होईल. पुसद तालुक्यातील महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. तसेच पुसदमध्ये दुग्धव्यवसायाला प्रचंड वाव आहे.
, प्रशिक्षणासाठी डेअरी कॅालेज आहे. पुसदमध्ये कोंबड्यांची कमतरता असल्याने आंध्रप्रदेशातून कोंबड्या व अंडे आयात केली जाते. या आयातीमुळे पुसदमधील जवळजवळ १०० कोटी रुपयांची उलाढाल आंध्रप्रदेशात जाते. तालुक्याला आर्थिक सक्षम करण्यासाठी दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन इ. व्यवसाय करण्याची गरज आहे. आपल्या तालुक्यातच उत्पादन घ्या, आपला पैसा आपल्या तालुक्यातच राहिला पाहिजे, असे आवाहन करुन पुसद तालुक्यात महिला सक्षमीकरणाचे उपक्रम चांगल्याप्रकारे राबविण्यात येतील, असेही ते म्हणाले.

 


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांनी आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. महिलांनी जास्तीत जास्त बचत गट स्थापन करावे, येणाऱ्या काळात भरपूर योजना येणार आहे. त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 


नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अतुल इंगळे यांनी नाबार्ड व शासनाच्या अनुदानित कर्ज योजनांची माहिती दिली. महिला बचत गटांनी उद्योग व्यवसाय वाढविण्यासाठी बॅंका व योजनांद्वारे कर्ज घ्या, सुरक्षिततेसाठी सर्व आर्थिक व्यवहार डिजिटल स्वरुपात करण्याचे आवाहन केले.

 


प्रास्ताविकात माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या प्रकल्प व योजनांची माहिती दिली. महिला स्वयंपूर्ण व सक्षम झाल्या पाहिजे, त्यासाठी माविमचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात सात हजार हून अधिक बचत गटांच्या माध्यमातून ८० हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून तालुक्यात पंचसूत्री कार्यक्रम राबविला जात आहे. पुसदमध्ये गोदाम उभारण्यासाठी सुमारे ८० लाख रुपये मंजूर झाले असून २४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. लवकरच त्याचे बांधकाम सुरु होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच महिलांसाठी पिंक रिक्षा, प्रकल्पांसाठी निधी व विक्री केंद्रासाठी जागेची मागणी त्यांनी केली.

 



यावेळी सिएमआरसी च्या वार्षिक अहवाल चे विमोचनशासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे धनादेश, परसबाग बियाणे, झाडे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच लाभार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करुन आपले प्रेरणादायी अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी श्री वानखेडे तर व्यवस्थापक अश्विनी पुनवटकर यांनी आभार मानले.

 


या महिला मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या मेळाव्याला पुसद तालुक्यातील महिला बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.

 



महिला मेळाव्यातील  वैशिष्ट्ये -

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद मार्फत १०० टक्के अनुदानावर कल्याणी महिला बचत गटाला  आरओ प्लांट करिता लक्ष रुपये, ख़ुशी महिला बचत गटाला केटरिंग करिता लक्ष ८० हजार रुपये, बिरसा मुडा महिला बचत गटाला मंडप डेकोरेशन करिता लक्ष रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला

माविम सिएमआरसी मार्फत २९ स्वयं सहाय महिला बचत गटाना कोटी ५८ लक्ष रुपये बँक कर्ज धनादेश वितरित करण्यात आला. शेळीपालन व शेतमाल खरेदी विक्री व्यवसायाकरिता लक्ष रुपये लोकसंचालित साधन केंद्राला नवतेजस्विनी सब प्रोजेक्ट अंतर्गत माविम यवतमाळ मार्फत देण्यात आला. यावेळी सुमारे ५०० महिलांना परसबाग बियाणे किट्स वितरित आली तसेच १०१ महिलांना शेवगा झाडे वितरीत करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब पुसद वतीने  आरोग्य तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला.

0000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित