जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात 'भूजल सप्ताह' साजरा
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारा तांत्रिक सत्राचे आयोजन
यवतमाळ, दि. 20 (जिमाका)
: : महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत
वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए),
यवतमाळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १६ जुलै ते २२ जुलै या कालावधीत 'भूजल
सप्ताह' साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून स्थानिक जवाहरलाल दर्डा
अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ येथे विद्यार्थ्यांसाठी एका विशेष तांत्रिक
सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
वाढते शहरीकरण, पाण्याचा अनिर्बंध
उपसा आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी टिकवून ठेवणे आणि त्याचे योग्य
व्यवस्थापन करणे ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. भावी पिढी
म्हणजेच महाविद्यालयीन तरुणांपर्यंत हा संदेश प्रभावीपणे पोहोचावा आणि त्यांच्यात
भूजल संवर्धन, पुनर्भरण आणि पाण्याचा सुयोग्य वापर याविषयी व्यापक जनजागृती
निर्माण व्हावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
वरिष्ठ भुवैज्ञानिक नितीन तट्टे
यांच्या संकल्पनेतून या तांत्रिक सत्रात मुख्य मार्गदर्शक म्हणून भूजल सर्वेक्षण
आणि विकास यंत्रणाचे तज्ज्ञ अधिकारी सहाय्यक भूवैज्ञानिक अनिकेत गादेकर आणि कनिष्ठ
भूवैज्ञानिक विश्वजीत पाऊलबुद्धे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना
भूजल पुनर्भरण तंत्रज्ञान, पाण्याचे योग्य नियोजन आणि जलसंधारणातील तरुणांची
भूमिका याविषयी अत्यंत सखोल व स्लाईड्सच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण मार्गदर्शन
केले.
Comments
Post a Comment