शिवशक्ती विद्यालयात शिक्षणाचा अधिकार व पोक्सो कायद्याबाबत जनजागृती

 यवतमाळ, दि. 14 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ, तालुका विधी सेवा समिती, कळंब आणि शिवशक्ती विद्यालय, कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने "शिक्षणाचा अधिकार, मुलांचे अधिकार, बेटी बचाओ-बेटी पढाओ आणि पोक्सो कायदा, २०१२" या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर) दिपक एच. दाभाडे होते. मुख्याध्यापक संजय वरगंठवार प्रमुख उपस्थित होते. तर पॅनल वकील विकास मोहोड आणि पॅनल वकील डी. जी. तेलंगे यांनी मार्गदर्शन केले.

 पॅनल वकील विकास मोहोड यांनी शिक्षणाच्या अधिकार कायद्याची माहिती देताना ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार असल्याचे सांगितले. खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांवर शारीरिक व मानसिक छळ करण्यास कायद्याने बंदी असून, आवश्यक कागदपत्रे किंवा प्रवेश परीक्षा नसल्याच्या कारणावरून कोणत्याही मुलाला शाळेत प्रवेश नाकारता येत नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शिक्षणाच्या अधिकार कायद्यातील विविध तरतुदींसह मूलभूत अधिकारांचीही माहिती दिली.

डी. जी. तेलंगे यांनी पोक्सो कायदा, २०१२ विषयी मार्गदर्शन केले. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक, लैंगिक अत्याचारापासून स्वतःचे संरक्षण, तसेच अशा घटना घडल्यास शिक्षक किंवा पालकांना तातडीने माहिती देण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितले. याशिवाय मुलांचे अधिकार, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची गरज आणि सामाजिक माध्यमांद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याबाबत उदाहरणांसह मार्गदर्शन केले.

 सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) दिपक एच. दाभाडे यांनी अध्यक्षीय समारोपात कायदा हा सर्वांसाठी समान असून जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाच्या जीवनाशी त्याचा संबंध असतो, असे सांगितले. कायदा केवळ कागदापुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष आचरणात यायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका माधुरी काळे यांनी केले, तर शिक्षिका स्मिता खंडारकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित