जागतिक कौशल्य स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची युवकयुवतींना संधी

ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रिया सुरू ;

यवतमाळ दि. 23 (जिमाका): जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या अनुषंगाने भारत कौशल्य स्पर्धा (इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन २०२६-२७) साठी नाव नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, जिल्ह्यातील पात्र, कुशल व इच्छुक युवक-युवतींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी ऑनलाइन नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सु. दि. उचले यांनी केले आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून, ऑलिम्पिक स्पर्धेच्या धर्तीवर जगभरातील २३ वर्षांखालील युवक-युवतींना त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून देते. भारतातील इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन ही देशातील सर्वात प्रतिष्ठित कौशल्य स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेद्वारे विविध व्यावसायिक व तांत्रिक क्षेत्रांतील प्रतिभावान युवक-युवतींना आपले कौशल्य, गुणवत्ता आणि प्राविण्य सिद्ध करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ मिळते. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांची राष्ट्रीय स्तरावर निवड केली जाते आणि त्यांना जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित वर्ल्डस्किल्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होते.

राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदकडून प्राप्त माहितीनुसार इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन २०२६-२७ साठी ऑनलाइन नाव नोंदणी सुरू झाली आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कौन्सिल तसेच विविध औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्याने भारत कौशल्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांमधून निवड झालेल्या उमेदवारांचे नामांकन पुढील इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन २०२६-२७ साठी करण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव पात्रता निकष निश्चित करण्यात आला आहे. स्पर्धेतील ५६ कौशल्य क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. तसेच सायबर सिक्युरिटी, इंडस्ट्री ४.०, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट सिस्टिम्स इंटिग्रेशन या टीम स्किल्ससाठीही हीच वयोमर्यादा लागू राहील. तर ऑटोनॉमस मोबाईल रोबोटिक्स, काँक्रीट कन्स्ट्रक्शन वर्क आणि लँडस्केप गार्डनिंग या टीम स्किल्ससाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतरचा असणे बंधनकारक आहे.

प्रतिभावान, कौशल्य संपन्न व स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक पात्र युवक-युवतींनी केंद्र शासनाच्या https://www.skillindiadigital.gov.in  स्किल इंडिया डिजिटल या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन नाव नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित