अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलैदरम्यान विशेष आरोग्य तपासणी व जनजागृती अभियान
यवतमाळ, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाच्या पुढाकारातून अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत विशेष आरोग्य तपासणी व जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथील बाह्यरुग्ण विभागात दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध आजारांची मोफत तपासणी, निदान, समुपदेशन व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश विविध आजारांचे लवकर निदान, वेळेवर उपचार, आरोग्याविषयी जनजागृती आणि नागरिकांचे आरोग्य सुदृढ करणे हा आहे. अनेक गंभीर आजार सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे न दाखविता वाढत असल्याने वेळेवर आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
या विशेष आरोग्य शिबिरात स्वेच्छा रक्तदान शिबीर, महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी व मार्गदर्शन, गर्भाशयमुख कर्करोग तपासणी, हाडांची घनता (बीएमडी) तपासणी, डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड, तसेच मुख कर्करोग तपासणी अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अभियानादरम्यान जनऔषधवैद्यक शास्त्र विभागामार्फत विविध शाळांमध्ये टाईप-१ मधुमेह, पॅलिॲक्टीव्ह केअर, ह्युमन मिल्क बँक, कृत्रिम अवयव व पुनर्वसन सेवा, हृदयरोग प्रतिबंध आणि असंसर्गजन्य आजार यांसारख्या विषयांवर जनजागृती कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत.
या शिबिरामध्ये नागरिकांना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला, गंभीर आजारांचे प्रारंभिक टप्प्यात निदान, आवश्यक असल्यास पुढील तपासण्या, उपचार व शस्त्रक्रियेसाठी त्वरित मार्गदर्शन, तसेच आहार, व्यायाम, जीवनशैलीतील बदल आणि रोगप्रतिबंधक उपायांबाबत समुपदेशनाचा लाभ मिळणार आहे. श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, तंबाखू सेवन करणारे, स्थूलपणाचा त्रास असलेले तसेच कर्करोगाच्या जोखमीतील नागरिकांनी या विशेष आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
चौकट
या अभियानांतर्गत श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रक्तपेढी विभागामार्फत 22 जुलै ते 28 जुलै दरम्यान रक्तदान शिबिर, शल्यचिकित्सा विभागामार्फत 22 जुलै ते 24 जुलै दरम्यान स्तन कर्करोग तपासणी शिबीर, स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र विभागामार्फत 25 जुलै ते 27 जुलै दरम्यान गर्भाशय व मुखकर्करोग तपासणी शिबीर, अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागामार्फत 22 जुलै ते 24 जुलै दरम्यान बोन मिनरल डेनसिटी तपासणी शिबिर,नेत्र विभागामार्फत 22 जुलै ते 25 जुलै दरम्यान नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर, दंत शास्त्र विभागामार्फत 25 जुलै ते 27 जुलै दरम्यान मुख्य कर्करोग तपासणी शिबीर हे विशेष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment