यवतमाळमध्ये पीएम विश्वकर्मा लोन उत्सव क्रेडिट आउटरीच कॅम्पचे आयोजन
यवतमाळ, दि. 22 (जिमाका) : केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभाग डीएफएस आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पुढाकारातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत 'पीएम विश्वकर्मा लोन उत्सव २०२६ (१ जुलै ते २४ जुलै २०२६) या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, या मोहिमेअंतर्गत २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता यवतमाळ येथे विशेष क्रेडिट आउटरीच कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
या मोहिमेचा प्रमुख उद्देश पूर्वी विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या किंवा
नाकारण्यात आलेल्या पीएम विश्वकर्मा कर्ज अर्जांचा पुनर्विचार करून पात्र कारागिरांना
तातडीने कर्ज मंजुरी मिळवून देणे हा आहे. शिबिरात पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी
करून त्यांना जागेवरच कर्ज मंजुरीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच योजनेच्या अटी,
आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेसंदर्भात लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी
विशेष मदत कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत सुतार, लोहार, कुंभार, नाभिक, शिंपी, गवंडी
यांच्यासह पारंपरिक १८ व्यवसायांशी संबंधित कारागिरांना आर्थिक सहाय्य व कर्ज सुविधा
उपलब्ध करून दिल्या जातात. या शिबिरात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अंचल प्रमुख पुणे अजय
कुमार सिंग, विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी, लीड जिल्हा व्यवस्थापक तसेच स्थानिक प्रशासनातील
अधिकारी उपस्थित राहून लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील ज्या कारागिरांचे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज अर्ज
अद्याप प्रलंबित आहेत किंवा यापूर्वी नाकारण्यात आले आहेत, अशा सर्व पात्र अर्जदारांनी
या विशेष संधीचा लाभ घ्यावा. संबंधितांनी राधामंगल कलर्स इन, धामणगाव रोड, यवतमाळ येथे
गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित शिबिरास आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित
राहावे, असे आवाहन अग्रणी बँक कक्ष, यवतमाळचे अग्रणी बँक व्यवस्थापक ज्ञानेश्वर टापरे
यांनी केले आहे.
Comments
Post a Comment