बोगस डॉक्टरवर महागाव तालुक्यात मोठी कारवाई;

 



मुडाणा येथे बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

>वैद्यकीय पात्रता व परवाना नसताना रुग्णांवर उपचार

>अॅलोपॅथी औषधे, इंजेक्शन्स व वैद्यकीय साहित्य जप्त

            यवतमाळ, दि. 6 (जिमाका) : महागाव तालुक्यातील मुडाणा येथे कोणतीही अधिकृत वैद्यकीय शैक्षणिक पात्रता, नोंदणी अथवा परवाना नसताना रुग्णांवर अॅलोपॅथी पद्धतीने उपचार करणाऱ्या एका कथित बोगस डॉक्टराविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ मधील कलम ३३(१) व ३३(२) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

            जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली महागाव तालुक्यात तालुकास्तरीय बोगस डॉक्टर समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून विनापरवाना व अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्याच मोहिमेअंतर्गत मुडाणा येथे ही कारवाई करण्यात आली.

            महागावचे तालुका आरोग्य अधिकारी तथा तालुकास्तरीय बोगस डॉक्टर समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रसेनजीत मिलिंद धुळधुळे यांना मिळालेल्या गुप्त माहिती तसेच नागरिकांच्या तक्रारीच्या आधारे महसूल व आरोग्य विभागाच्या पथकाने ५ ऑक्टोबर  रोजी मुडाणा येथील उज्वल जगदीश ठाकूर वय ४३ यांच्या घरी अचानक पाहणी केली.

            या तपासणीदरम्यान, संबंधित इसम गळ्यात स्टेथोस्कोप घालून एका रुग्णावर अॅलोपॅथी औषधोपचार व सलाईन लावून इलाज करताना रंगेहात आढळला. त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी कोणतीही वैध शैक्षणिक पात्रता, नोंदणी किंवा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या क्लिनिकची पाहणी केली असता, तेथे रुग्णांची तपासणी करण्याची खोली तसेच आंतररुग्ण (इनडोअर) विभागासारखे तीन बेड असलेली खोली दिसून आली. त्यामुळे सदर ठिकाणी अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

            घटनास्थळावरून स्टेथोस्कोप, विविध प्रकारच्या अॅलोपॅथी औषधांची इंजेक्शन्स उदा. सेफट्रिॲक्झोन, पायपरसीलीन, क्लोरेक्वीन, बेटामीथेसोन इ. औषधी व सोडियम, लायडोकेन स्प्रे, स्टेराइल स्किन स्टेपलर तसेच 'डॉ. यु. के. ठाकूर, एन.डी. संभाजीनगर, मंगल क्लिनीक' असे छापलेले रुग्ण पावती पुस्तक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तपासणीदरम्यान ‘डॉ. यु. के. ठाकूर, एन.डी. संभाजीनगर, मंगल क्लिनिक’असे छापलेले रुग्ण पावती पुस्तकही पथकाच्या हाती लागले. संबंधित सर्व साहित्य पंचनामा करून जप्त करण्यात आले आहे.

            तालुका आरोग्य अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रसेनजीत मिलिंद धुळधुळे यांच्या तक्रारीवरून महागाव पोलीस ठाण्यात आरोपी उज्वल जगदीश ठाकूर याच्याविरुद्ध वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३(१), ३३ (२) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पांडुरंग मुरकुटे करीत आहेत. विनापरवाना आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बोगस डॉक्टरांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुभाष ढोले यांचेकडून देण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित