जिल्ह्यात सर्व न्यायालयामध्ये २१ नोव्हेंबरला विशेष लोकअदालत

 

            यवतमाळ, दि. 6 (जिमाका) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार  जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

            प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ आणि जिल्हा वकील संघ, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, यवतमाळ तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये धनादेश अनादर अर्थात चेक बाऊन्स प्रकरणांसाठी ही विशेष लोकअदालत घेण्यात येणार आहे.

            या विशेष लोकअदालतीमध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत येणारी न्यायालयात प्रलंबित असलेली तसेच दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. वाद मिटविण्यासाठी न्यायाधीश, तज्ज्ञ वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे मंडळ पक्षकारांना आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन करणार आहे.

            लोकअदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही. तसेच लोकअदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपीलाची तरतूद नसल्याने तडजोडीने प्रकरणाचा कायमस्वरूपी निपटारा होतो. विशेष लोकअदालतीच्या माध्यमातून वाद मिटवल्यामुळे पक्षकारांचा वेळ व पैसा वाचतो. न्यायालयीन प्रक्रियेत होणारा त्रास टाळता येतो आणि आपसी संमतीने जलदगतीने न्याय मिळण्यास मदत होते.

            विशेष लोकअदालतमध्ये ठेवण्याकरीता प्रलंबित प्रकरणांसाठी संबधीत न्यायालयात अर्ज सादर करावा आणि दाखलपूर्व प्रकरणांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हयातील ईतर तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपली जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून आपसी तडजोडीने मिटवावीत असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवमाळ तर्फे करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित