दुष्काळ परिस्थितीवर मात करणे सामूहिक जबाबदारी - आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
राळेगाव विधानसभा क्षेत्रातील उपाययोजनांचा आढावा
यवतमाळ, दि. २७ : दुष्काळी परिस्थितीवर मात करणे ही सामूहिक जबाबदारी असून शासन आणि प्रशासनात समन्वय राखून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. यासाठी सर्व विभागांनी आवश्यक नियोजन करावे. तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात सातत्यपूर्ण संवाद ठेवावा, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.
राळेगाव विधानसभा क्षेत्रातील दुष्काळी परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महसूल भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, उपविभागीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पदाधिकारी प्रफुल्ल चव्हाण, सतीश मानलवार, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.
या बैठकीत मंत्री प्रा. डॉ.अशोक उईके यांनी बेंबळा सिंचन प्रकल्प, पाणीसाठा, पाण्याचा वापर, पिकांसाठी पाण्याची उपलब्धता, पाणी विसर्ग आणि पाणीउपसा परवानगी या विषयांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्धता व चारा लागवड, शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता आणि पशुधनाच्या व्यवस्थापनाबाबत चर्चा करण्यात आली.
बेंबळा प्रकल्पग्रस्त गावांचे पुनर्वसन, पुनर्वसित गावांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा तसेच विद्युत पुरवठ्याच्या स्थितीचाही यावेळी आढावा घेतला. संबंधित विभागांनी या विषयांवर आवश्यक कार्यवाही करून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
दुष्काळी परिस्थितीवर मात करणे ही शासन, प्रशासनासह ती सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करणे आणि स्थानिक पातळीवरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी नियोजन करणे आवश्यक असल्याचे डॉ. उईके यांनी सांगितले.
तसेच बैठकीत नागरिकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीत जिल्हाधिकारी विकास मीना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री यांच्यासह विभाग प्रमुखांनी उपाययोजनाबाबत माहिती दिली.




Comments
Post a Comment