शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
यवतमाळ, दि. २७ : महाराष्ट्र शासनाच्या क्रोडा व युवक सेवा संचालनालयातर्फे राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींना प्रतिष्ठेचा 'शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार' प्रदान करण्यात येतो. सन २०२४-२५ आणि सन २०२५-२६ या दोन्ही वर्षांतील पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास शासनाने आता ५ दिवसांची अर्थात ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
यापूर्वी १२ ऑक्टोबर २०२६ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरताना अर्जदारांना तांत्रिक अडचणी येत असल्याने संचालनालयाने ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://sports.maharashtra.gov.in अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे.
पुरस्काराचे प्रकारः याअंतर्गत जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम) आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) या श्रेणींसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत.
इच्छुक उमेदवारांनी क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावरील ताज्या घडामोडी या विभागात जाऊन "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मार्गदर्शक सूचना" वाचाव्यात आणि विहित मुदतीत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे
000000
Comments
Post a Comment