रानभाजी महोत्सव शनिवारी; नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 14 (जिमाका) : मानवी आरोग्यासाठी
सकस व पौष्टिक आहाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतशिवारात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या
रानभाज्या, रानफळे, फुलभाज्या आणि कंदवर्गीय भाज्यांचे पौष्टिक व आरोग्यविषयक महत्त्व
सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे, तसेच या नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर व्हावा,
या उद्देशाने १५ ऑगस्ट २०२६ रोजी येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन
केंद्र, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता
पालकमंत्री संजय राठोड, यांच्या हस्ते होणार आहे.
रानभाज्या नैसर्गिकरीत्या उगवत असल्याने
त्यांच्यावर रासायनिक कीटकनाशके किंवा बुरशीनाशकांची फवारणी केली जात नाही. त्यामुळे
नैसर्गिक व पौष्टिक आहाराच्या दृष्टीने या भाज्यांना विशेष महत्त्व आहे. ग्रामीण भागात
सहज उपलब्ध असलेल्या या भाज्यांची शहरातील नागरिकांना माहिती व्हावी आणि त्यांची थेट
विक्री होऊन शेतकरी, महिला शेतकरी तसेच महिला बचतगटांना आर्थिक लाभ मिळावा, हा महोत्सवामागील
प्रमुख उद्देश आहे.
जिल्ह्यातील विविध रानभाज्यांचे प्रदर्शन व
विक्री
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या
रानभाज्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये तरोटा, आंबुशी, मसालापान, माठ/चबलाई, घोळ, चिवळ,
राजगीरा, अंबाडी, गुल भुईआवळा, चाकवत, आंबटचुका, पुदिना, काठमाठ, फांदी, शतावरी, ओवा
पान, गवती चहा, आघाडा, कना, तांदुळ, अळुची पाने, पाथरी, मायाळू, रानशेष, कुरडू, भारंगी,
कपाळालोडी, फोडशी आणि बोपली आदी रानभाज्यांचा समावेश आहे.
यासोबतच करटोली, वाघाटी, कवठ, बेल, टेंभुर्णी,
उंबर, शेवगा, रानभेंडी, चारोळी, वाळुक, शेराणी, अळीची, लाल अंबाडी, हरसुल, बिहाडा,
हिरडा, करवंद, आवळा, कुडा आणि भोकर आदी रानफळेही उपलब्ध आहेत.
महोत्सवात शेवगा फूल, हादगा फुल, जिवती
फुल, कुडाची फुले, सकनकळी, शंखपुष्पी, मोहफूल आणि उतरण यांसारख्या फुलभाज्यांचीही माहिती
व उपलब्धता नागरिकांना करून देण्यात येणार आहे. तसेच सुरण, साखरकंद आणि बांबू यांसारख्या
कंदवर्गीय भाज्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
पोषणमूल्यांचा खजिना
रानभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्व
‘अ’, जीवनसत्त्व ‘क’ तसेच तंतुमय पदार्थ यांसारखी विविध पोषणमूल्ये आढळतात. संतुलित
आहाराचा भाग म्हणून योग्य प्रकारे स्वच्छ करून आणि शिजवून या भाज्यांचा आहारात समावेश
करता येतो.
लोह शरीरातील हिमोग्लोबिन निर्मितीसाठी
आवश्यक असून, शरीराची कार्यक्षमता आणि ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता टिकविण्यास मदत
करते. कॅल्शियम हाडे व दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असून शरीरातील विविध जैविक
प्रक्रियांमध्ये त्याची भूमिका असते. जीवनसत्त्व ‘अ’ डोळ्यांच्या व दृष्टीच्या आरोग्यासाठी
उपयुक्त आहे, तर जीवनसत्त्व ‘क’ शरीराच्या सामान्य प्रतिकारशक्तीला आणि ऊतींच्या आरोग्याला
हातभार लावते.
रानभाज्यांपासून विविध चविष्ट पदार्थ तयार
करता येतात. त्यांचा रस्सा, भाजी, उकडलेले किंवा भाजलेले पदार्थ अशा विविध स्वरूपात
त्यांचा आहारात उपयोग केला जातो. काही स्थानिक वनस्पतींचा पारंपरिक पद्धतीने औषधी उपयोगही
केला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र कोणतीही वनस्पती औषध म्हणून वापरण्यापूर्वी
तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीवर भर
रानभाज्या विक्री करणारे शेतकरी, महिला
शेतकरी आणि महिला गट यांच्यासाठी थेट विक्रीची व्यवस्था निर्माण करणे, तसेच ‘उत्पादक
ते ग्राहक’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविणे हा या महोत्सवाचा महत्त्वाचा उद्देश आहे.
यामुळे शहरातील नागरिकांना नैसर्गिक व स्थानिक खाद्यपदार्थांची माहिती मिळण्याबरोबरच
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
रानभाज्यांचे संरक्षण व संवर्धन करणे ही
काळाची गरज असून, या नैसर्गिक संपत्तीचे महत्त्व भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी
नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर रानभाजी महोत्सवाला विशेष
महत्त्व प्राप्त झाले आहे.
नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
जिल्ह्यातील नागरिकांनी १५ ऑगस्ट रोजी
सकाळी १० वाजता के. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र येथे आयोजित रानभाजी महोत्सवास
मोठ्या संख्येने भेट द्यावी, रानभाज्यांची माहिती घ्यावी आणि शेतकरी व महिला गटांनी
आणलेल्या उत्पादनांची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक, आत्मा, यांनी केले आहे.
Comments
Post a Comment