गर्वाने फडकवा घरोघरी ‘तिरंगा’!

 ‘हर घर तिरंगा अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन 

यवतमाळ, दि. 10 (जिमाका): देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातही विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवत अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे , असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

राज्य शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी तसेच शाळा-महाविद्यालयांना ‘हर घर तिरंगा’ अभियान प्रभावीपणे साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम, तिरंगा रंगाची रोषणाई, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंग्यासोबत सेल्फी, रांगोळी स्पर्धा यांसह विविध उपक्रमांचा समावेश आहे. 

पोस्ट ऑफिसमध्ये अल्प दरात तिरंगा उपलब्ध 

‘हर घर तिरंगा’ अभियानात नागरिकांना आपल्या घरी राष्ट्रीय ध्वज फडकविता यावा, यासाठी डाक विभागाच्या माध्यमातून अत्यंत अल्प दरात तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या जवळच्या डाक कार्यालयातून तिरंगा ध्वज खरेदी करून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखण्याचे आवाहन 

स्वातंत्र्य दिनाचा उत्सव उत्साहात साजरा करताना प्रत्येक नागरिकाने राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान व प्रतिष्ठा कायम राखावी. घरोघरी तिरंगा फडकविताना राष्ट्रध्वजाच्या नियमांचे पालन करावे आणि अभियानात अभिमानाने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान